लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - घरात सुख यावे यासाठी आधी पूजा करावी लागेल, असे सांगून एका कथित साधू आणि त्याच्या साथीदाराने महिलेकडून १५०० रुपये हडपले. नंतर तिला मोठे संकट येण्याची भीती दाखवून तिचे दागिने लंपास केले. ६ जून ते १३ ऑगस्टदरम्यान घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे नोंदविली.
जयश्री सिवा स्वामी (वय ३१) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या गोरेवाडा गिट्टीखदानमध्ये राहतात. ६ जूनला साधूच्या वेशातील एक व्यक्ती साथीदारासह त्यांच्या घरी आला. तुम्ही चिंतेत दिसता. तुमची कोणतीही अडचण सांगा, साधूबाबा निवारण करतील, अशी थाप या भामट्यांनी मारली. जयश्री यांनी काैटुंबिक तसेच व्यक्तिगत अडचण सांगताच पूजा करावी लागेल म्हणून त्यांच्याकडून १५०० रुपये घेतले. १३ ऑगस्टला आरोपी पुन्हा महिलेच्या घरी आले. तुमच्यावर मोठे अरिष्ट येणार आहे, अशी भीती दाखवून आरोपींनी जयश्री यांच्याकडून मंगळसूत्र, सोन्या-चांदीचे दुसरे दागिने आणि तांब्या-पितळेची भांडी असा हजारोचा ऐवज पूजा करण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतला. पूजा करून परत येतो, असे सांगून ते निघून गेले. बराच वेळ होऊनही ते परत आले नाही. फोन केला असता साधूबाबांना दुखापत झाली, अशी थाप त्याच्या साथीदाराने मारली. त्यांनी पुन्हा प्रतिसाद देणे बंद केल्याने महिलेने आपल्या कुटुंबीयांजवळ हा प्रकार सांगितला, नंतर गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----