लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीच्या दिवसात हातमाग कापडाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकण्यात येत आहे. त्यामुळे खऱ्या हातमाग कापडाची ओळख लक्षात घेऊनच खरेदी करावी तसेच हातमागाच्या नावावर यंत्रमागाचे कापड विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले आहे.हातमागावर साडी व इतर कापड तयार करताना धाग्याचा ताण कमी असल्यामुळे कापडाला स्पर्श केल्यास ते मऊ वाटते. यंत्रमागाच्या कापडात कडकपणा जाणवतो. हातमागाचे विणकाम एकसारखे असून काही ठिकाणी धाग्याची गाठ दिसते. तर यंत्रमागाचे कापड एकसारखे असून त्यात असा प्रकार दिसत नाही. यंत्रमागाच्या कापडाची किनार एकसारखी असते आणि हातमागाच्या कापडाची किनार एकसारखी नसते हा फरक जाणवतो. हातमागावरील पारंपरिक साड्या, शाल, स्टोल्सचे दोन्ही बाजूचे नक्षीकाम एकमेकांचे प्रतिबिंब असल्यासारखे दिसते. हातमागावर कापडाचे विणकाम करताना कापडाच्या दोन्ही किनारावर ताण देण्यासाठी कंसरीच्या वापरामुळे कापडाच्या किनाऱ्यावर छिद्र दिसते. परंतु हे छिद्र एकसारखे अंतरावर नसते. हातमागाच्या साडीच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डिझाईन दिसून येते आणि साडीच्या मागील बाजूला वापरलेल्या धाग्याची व जरीची फ्लोटींग दिसत नाही. खऱ्या पैठणीत पुढील व मागील दोन्ही बाजूचे नक्षीकाम एकमेकांचे प्रतिबिंब असल्यासारखे दिसते. हस्तकला असल्यामुळे प्रत्येक पैठणी वेगळी असते. दोन पैठणीतील नक्षीकाम तंतोतंत सारखे आढळत नाही. नैसर्गिक रंग वापरल्याने पैठणीत फक्त मूलभूत रंग सापडतात. सूक्ष्म नक्षीकाम व सूक्ष्म प्रमाणात समरूपता आढळत नाही. केंद्र शासनातर्फे हातमाग कापडाचे तसेच रेशीम वस्त्राच्या उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला आवश्यक निकषावर हँडलूम मार्क आणि सिल्क मार्क अंतर्गत प्रमाणित करून विक्रीसाठी टॅग पुरविले जातात. त्यामुळे ग्राहक हे टॅग पाहून विश्वासाने हातमागाचे कापड खरेदी करू शकतात. हातमाग महामंडळाने भौगोलिक नामांकनांतर्गत पैठणी साडी व करवतीकाठी साडी या दोन उत्पादनांची नोंद प्राप्त केली असून या विशेष वस्त्राचे उत्पादन त्याच नावाने इतर भागात करणे हा गुन्हा आहे. ग्राहकांनी खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक लक्षात घेऊनच कापड खरेदी करण्याची गरज असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्त तथा हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी कळविले आहे.
खोट्या हातमागापासून होणारी फसवणूक थांबवा : माधवी खोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 10:43 PM