मोफत औषध वाटप : शून्य ते पाच वर्षांच्या बाळांना लाभ नागपूर : राज्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ११ टक्के बालमृत्यू हे अतिसारामुळे झाल्याचे आढळले आहे. उन्हाळा व पावसाळ्यात जास्त प्रमाणात होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी अतिसारावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याची बाब ओळखून आरोग्य विभागाच्या वतीने २८ जुलैपासून अतिसार नियंत्रण पंधरवडा अभियान सुरू केले आहे. शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तर ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाकडून घराघरांमध्ये आजाराची माहिती व नि:शुल्क औषधे दिली जात आहे.जिल्ह्यात आशा स्वयंसेविका योजनेंतर्गत मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यात २८ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला सोमवारपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील पाच वर्षाखालील बालकांना आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करून अतिसार नियंत्रणासाठी ‘ओआरएस’ पाकिटे व झिंक गोळ्याचे नि:शुल्क वितरण करण्यात येत आहे. हे अतिसार नियंत्रण दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्तनपान व शिशुपोषणासंदर्भात मार्गदर्शन करणे व सल्ला देणे, हात धुण्याच्या पद्धतीचे मार्गदर्शन करणे, अतिसार नियंत्रण पंधरवडा संपल्यानंतर या संदर्भातील अहवाल तयार होणार आहे.दुसऱ्या आठवड्यात गावामधील सर्व कुपोषित मुलांची यादी तयार करून त्याचा पाठपुरावा करणे, जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भसेवा देणे, बाळाच्या आहार पद्धतीसंदर्भात सल्ला देणे, पाच वर्षांखालील मुलांचे सर्वेक्षण करून गावनिहाय यादी तयार करणे, पाच वर्षांखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक औषधांचे वाटप करणे, अशा प्रकारे अतिसार नियंत्रणासाठी कार्यक्र मांचे नियोजन करण्यात आले आहे. पालकांनी या अभियानातील आशा स्वयंसेविकांना सहकार्य करून अतिसार नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
बालमृत्यू रोखणार अतिसार नियंत्रण
By admin | Published: July 31, 2014 1:04 AM