लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे, परंतु कारवाई करण्यात मात्र ग्रामीण पोलीस आघाडीवर दिसून येत आहे.सध्या लोकसभा निवडणुकीचा संग्राम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिलला नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गंभीर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिलेले आहेत. नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. शंभरावर छोट्या-मोठ्या टोळ्या असल्याचे सांगितले जाते. या कारवाईसाठी शहर पोलिसांनी आतापर्यंत १,०३८ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ६२८ गुन्हेगारांना बेल वॉरंट देण्यात आला आहे. गुन्हेगारांविरुद्धची प्रतिबंधात्मक कारवाई अजूनही सुरूच आहे. यासोबतच शहरात ६२३ लोकांनी शस्त्र जमा केले आहेत.तर ग्रामीण पोलिसांनी १६३६ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ६०० गुन्हेगारांना बेल वॉरंट देण्यात आले. ९४ लोकांनी शस्त्र जमा केले आहे.