लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : नवीन साेयाबीनला उत्तम भाव मिळत असल्याचे संदेश साेशल मीडियावर व्हायरल हाेत असतानाच उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ एका शेतकऱ्याकडील १३ क्विंटल २० किलाे साेयाबीन प्रति क्विंटल ६,००१ रुपये दराने खरेदी करण्यात आले. उर्वरित ८७ क्विंटल साेयाबीनची खरेदी मात्र प्रति क्विंटल ३,४०० ते ४,५०० रुपये दराने खरेदी करण्यात आले. अति पाऊस व प्रतिकूल वातावरणामुळे साेयाबीनचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे काळवंडलेले साेयाबीनदेखील शेतकऱ्यांनी बाजारात विकायला आणले हाेते.
ओलावा अधिक, काळवंडलेला, कांड्यायुक्त आणि तेलही काढले जाऊ शकत नाही, अशा अत्यंत दयनीय अवस्थेमधील सोयाबीन गुरुवारी (दि. २३) उमरेडच्या पहिल्याच बाजारात दाखल झाले. अति पावसामुळे सोयाबीनचे कसे हाल झालेत, याचे चित्र प्रत्यक्षात बघावयास मिळाले. ओलावा, काळवंडलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ४,५०० रुपये दर मिळाले. चेतन रमेश नैनवाणी, रा. बेला, ता. उमरेड या एकमेव शेतकऱ्याकडील १३ क्विंटल २० किलाे साेयाबीनला प्रति क्विंटल ६,००१ रुपये दर मिळाला. ही साेयाबीन अडते मंगेश डहाके यांनी खरेदी केली. उमरेड बाजार समितीच्या आवारात पहिल्या दिवशी (गुरुवार, दि. २३) ९९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
मागील काही दिवसांपासून विविध बाजार समित्यांचे दाखले देत सोयाबीनला किती चांगले भाव मिळत आहेत, हे दाखविण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात होते. वास्तविक काही बाजार समित्यांमध्ये केवळ शुभारंभ म्हणून १-२ क्विंटलला हा भाव दिल्या गेला आणि बातम्या पसरविल्या गेल्या. दरम्यान, साेयाबीन खरेदीच्या शुभारंभप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपाध्यक्ष ॲड. विजय खवास, संचालक विकास देशमुख, शिवदास कुकडकर, हिरामण नागपुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
.....
साेशल मीडियावरील ‘बाता’
कुठे ११,१११ तर कुठे १०,५०० रुपये प्रति क्विंटल दराने साेयाबीनची खरेदी सुरू असल्याचे मॅसेज साेशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. वास्तवात, या दराने केवळ ५६ ते ६७ किलाे साेयाबीन खरेदी करण्यात आली, याकडे कुणीही बारकाईने लक्ष दिले नाही. जेव्हा या मॅसेजवर विश्वास ठेवणारे शेतकरी उमरेड बाजार समितीत साेयाबीन विकायला गेले तेव्हा त्यांना ३,४०० ते ४,५०० रुपये दर अनुभवायला मिळाला.
...
आधी मदतीचे बोला
अति पावसामुळे ओलावा अधिक आणि काळवंडलेल्या अवस्थेतील सोयाबीन प्रत्येक शेतकऱ्यांकडे बघावयास मिळणार आहे. उत्पादनात प्रचंड घट आणि निकृष्ट दर्जाचे सोयाबीन या संकटामुळे अनेकांना कापणी आणि काढणी परवडणारी नाही. शिवाय उमरेड विभागात संततधार सुरूच आहे. यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतामधून बाजारात पोहोचेल की नाही, याची शाश्वतीच उरली नाही. यामुळे आता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. केवळ पोकळ आश्वासने नको, आधी मदतीचे बोला, असाही संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत.