नागपूर : पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने बांधकामाच्या साहित्याचे दर वाढले आहे. इमारती, घर उभे करताना लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विटांचा दर गेल्या पाच वर्षात दुप्पट झाला आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच कोळसा, मजुरी, राखेच्या वाढलेल्या दराचे परिणाम विटांच्या किमतीवर होत आहे.
- वर्षानिहाय विटाचे दर (हजार विटा)
२०१७ - २७०० ते ३२०० रुपये
२०१८ - ३००० ते ३८०० रुपये
२०१९ - ३५०० ते ४२०० रुपये
२०२० - ४५०० ते ५५०० रुपये
२०२१- ५७०० ते ७५०० रुपये
२) - का वाढले दर?
विटा बनविण्यासाठी राखेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. राख ही ३२०० ते ३५०० रुपये ट्रक उपलब्ध आहे. विटभट्ट्यांसाठी कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोळशाचे दर ९००० रुपये टन झाले आहे. मजुरी तर १००० विटांमागे ७०० ते ८०० रुपये द्यावी लागत आहे. मीठ, कुटार याचाही मोठा खर्च आहे. त्यामुळे विटांचे दर वाढले आहे.
- म्हणून वाढल्या घरांच्या किमती
घर बांधण्यासाठी रेती, गिट्टी, सिमेंट, लोखंड, विटा आदी साहित्य लागते. या सर्वाच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याला सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या किमती आहेत. ट्रान्सपोर्टेशन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बांधकाम साहित्याबरोबरच मजुरीही वाढल्याने घराच्या किमती वाढल्या आहेत.
- सिमेंटच्या विटात ३० टक्के बचत
हातभट्टा, राऊंडभट्टा यावर तयार होणाऱ्या विटांपेक्षा सिमेंटच्या विटा २५ ते ३० टक्के स्वस्त आहे. हातभट्टा आणि राऊंडभट्ट्यावर तयार होणाऱ्या विटांना कोळसा, कुटार यांची गरज असते. सिमेंट विटा या ८० टक्के राखेपासूनच बनत असल्याने हा खर्च लागत नाही.
- भाव वाढतच राहणार
दोन वर्षापूर्वी ५००० रुपये टन असणारा कोळसा ९००० हजार रुपये टनावर गेला आहे. इंधनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. मजुरीतही वाढ झाली आहे. त्यामुळे विटांच्या किमती वाढल्या आहेत आणि पुढेही वाढतच राहणार आहे. पण या इंधनाच्या किमती वाढल्याने छोट्या विटभट्टीवाल्यांनी आपली भट्टी बंद केली आहे. खर्चाच्या तुलनेत विटांना अपेक्षित दर मिळत नाही.
- गणेश सोलंके, विटभट्टी चालक