लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महागाईत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून, गरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे फिनिश मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यातच स्पर्धेच्या युगात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॅकिंगची किंमत तीच ठेवून मालाचे वजन कमी करून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यात कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत. या स्पर्धेत ग्राहकांचा मात्र तोटा होत आहे.
स्पर्धेच्या युगात कंपन्यांना मालाची किंमत वाढविणे परवडणारे नाही. त्यातून अनोखा मार्ग काढत ५, १० रुपयांच्या पॅकेटचा आकार छोटा केला आहे. याची पुसटशी कल्पना ग्राहकांना नाही. मात्र मालाची विक्री धडाक्यात होत आहे. बिस्किट, चिप्स, कुरकुरे, नमकीन, मॅगी, नुडल्स, मिक्सर, नट, गूळ, काजू, बदाम आणि अन्य खाद्यपदार्थांचे पॅकेट छोटे करून बाजारात विक्री करण्यात येत आहेत. अर्थात १०० ग्रॅमचे पॅकेट ८० ग्रॅम आणि ७५ ग्रॅमचे पॅकेट ६० ग्रॅमवर आले आहे. खरेदी करताना याची कल्पना लोकांना आलीच नाही.
ग्राहकांनी सजग राहावे
नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, एफएमसीजी कंपन्या उत्पादनाचा खर्च वाढल्याच्या नावाखाली पॅकिंग वस्तूंचे वजन कमी करीत आहे. वर्षभरात खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाले आहेत. अन्य कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५ आणि १० रुपयांत मिळणारे चिप्स आणि कुरकुऱ्यांच्या वजनात घट झाली आहे. पारले, ब्रिटानिया, बिक्स फार्म कंपन्यांनी ५, १०, २०, ३० रुपयांच्या बिस्किट पॅकिंगचे वजन कमी केले आहे, तर काहींनी नमकीनचे वजन पूर्वीचेच ठेवून भाव वाढविले आहेत. टूथपेस्टचेही वजन कमी झाले आहे. काही सजग ग्राहक याबाबत विचारणा करतात; पण आम्ही काहीही करू शकत नाही. ब्रॅण्डेड मालाची विक्री जास्त होत असल्यामुळे माल विक्रीसाठी ठेवावा लागतो. काय खरेदी करावे, हे ग्राहकांवर अवलंबून आहे.
कणीक, तांदूळ, बेसन, रवा, मैदा, खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ग्राहक दूर जाण्याच्या भीतीने कंपन्या जास्त किमतीत विकण्यास तयार नाहीत. त्यामुळे मालाची किंमत तशीच ठेवून वजन कमी करून विकण्यात कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत. एकीकडे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, तर दुसरीकडे कोरोनामुळे बाजारात मंदी आहे. त्यामुळेच वजन कमी करून नफा त्याच प्रमाणात ठेवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे.
छोट्या पॅकेटची बाजारपेठ मोठी
गेल्या काही वर्षांपासून घरोघरी मुलांसाठी ५ आणि १० रुपयांचे चिप्स व नमकीनचे पॅकेट खरेदीचे प्रमाण वाढले आहे. छोट्या पॅकेटची बाजारपेठ वाढली आहे. ग्राहक दूर जाऊ नये म्हणून कंपन्या मालाचे वजन कमी करून नेहमीच विक्री करतात. भाव वाढविण्याची जोखीम कोणतीही कंपनी घेत नाही. मात्रा कमी करून त्याच किमतीत विकून कंपन्या नफा कमवित आहेत. कंपन्यांचे अधिकारी म्हणाले, कमी किमतीच्या श्रेणीतील उत्पादनाचे पॅकिंग आणि जाहिरातींवर जास्त खर्च येतो. शिवाय स्वस्त वस्तूंचे लोकांमध्ये आकर्षण आहे. त्यामुळेच कंपन्या जोखीम घेत नाहीत.
कंपन्या भाव न वाढविता वजन करतात कमी
पॅकबंद मालाची किंमत पूर्वीसारखीच ठेवून कंपन्या मालाचे वजन कमी करतात. याची कल्पना ग्राहकांना येत नाही. साबण असो वा खाद्यपदार्थ पॅकिंगच्या वस्तूंचे वजन अशाच प्रकारे कमी-कमी होत आहे. कंपन्यांचा नफा ठरला आहे. त्यामुळेच भाव न वाढविता कंपन्या वजन कमी करतात. ग्राहकांनीही जागरूक राहावे.
प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघ