आनंद शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध देशांमधील मंदीच्या सावटाखाली आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचे प्रतिबिंब नागपुरातदेखील दिसून येत आहे. मागील वर्षभरात २४ कॅरेट सोन्याच्या दरात १० हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी दर वाढून ‘जीएसटी’सह ४० हजारांच्या पार गेले. हा एक ‘रेकॉर्ड’च म्हणावा लागेल. आगामी काळात नवरात्रोत्सव व दिवाळी असल्याने सोन्याचे दर प्रति तोळे ४५ हजार रुपयांहून अधिक जाऊ शकतात, असा अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्यासोबतच चांदीचे दरदेखील वधारले आहे. प्रति किलो चांदीचे दर ४५ हजारांहून अधिक झाले आहेत. सोमवारी दुपारी सोन्याच्या २४ कॅरेटचा दर प्रति तोळे ४० हजार २०० रुपयांवर गेला होता. मागील वर्षी याच काळात हे दर २९ हजार ७०० रुपये इतके होते. वर्षभरात सोन्याचे दर १० हजार ४०० रुपयांनी वाढले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सराफा स्वर्णकार महामंडळाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली. यावर्षी जानेवारीमध्ये सोन्याची ३१ हजार ७०० रुपये प्रति तोळा या दराने विक्री झाली होती. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांत वेगाने दर वाढले आहेत. आगामी काळात हे भाव आणखी वाढू शकतात. सोना-चांदी ओळ कमिटीनुसार सोमवारी सायंकाळी बाजार बंद होताना २४ कॅरेट सोन्याचे दर ३५ हजार ६५० रुपये प्रति तोळे (जीएसटी अतिरिक्त) आणि पक्क्या चांदीचे दर ४५ हजार रुपये प्रति किलो (जीएसटी अतिरिक्त) वर बंद झाले.
का वधारले भाव ?जगभरात काही महिन्यांपासून अनिश्चिततेचे वातावरण आहे. विविध देशांसोबतच भारतातदेखील रिझर्व्ह बँकेकडून सोन्याचा ‘रिझर्व्ह फंड’ वाढविला जात आहे. सोनं नैसर्गिक धातू आहे व याचा काहीच विकल्प नसू शकतो. खाणींमध्ये याची संख्या कमी होत आहे. खाणींमधून जितक्या खोलीवरून सोने काढले जात आहे, तेवढा त्यावरील खर्च वाढतो आहे. त्यामुळे आशिया खंडात सोन्याची मागणी वाढत आहे व त्यामुळे भाव वाढले आहे, असे राजेश रोकडे यांनी सांगितले.
चांदी ४५ हजारांच्या पारसोन्याप्रमाणे चांदीचे दरदेखील वधारले आहेत. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात चांदीचे दर ३७ हजार ते ३८ हजार रुपये प्रति किलो होते. मागील वर्षभरात यात १२-१३ हजारांची वाढ झाली आहे. सोमवारी हे दर ‘जीएसटी’सह ४५ हजारांच्या पार गेले. दिवाळीपर्यंत चांदीचे दर प्रति किलो ५० हजारांच्या पार जाण्याचा अंदाज आहे.