लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यंतरी मुसळधार पावसामुळे भाज्या शेतातच खराब झाल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी नव्याने भाज्यांची लागवड केली आणि सर्व पीक एकाचवेळी आले. अशी स्थिती दरवर्षी जानेवारी महिन्यात असते. पण यंदा डिसेंबर महिन्यातच दिसून येत आहे. स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक दुप्पट, तिपटीने वाढल्याने भाज्या कवडीमोल भावात विकल्या जात आहेत. कळमना आणि कॉटन मार्केटमध्ये कमिशन टाळण्यासाठी शेतकरी स्वत: चौकाचौकात गाड्या लावून भाज्यांची विक्री करीत असल्याचे शहरात सर्वत्र दिसून येत आहे.
हिवरीनगर, वर्धमाननगर, सक्करदरा, नंदनवन, महाल, बडकस चौक आणि अनेक बाजारात शेतकरी स्वत:च भाज्यांची विक्री करीत आहेत. फूलकोबी (एक) १० रुपये, पत्ता कोबी ५ रुपये किलो, पालक ५ रुपये जुडी, मेथी १० रुपये जुडी, कोथिंबीर १० रुपये जुडी, टमाटर १० ते १५ रुपये किलो, मूळा ८ ते १० रुपये किलो असे चौकातील विक्रेत्यांचे भाव आहेत. यामुळे थोडेफार आर्थिक नुकसान भरून निघत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. मिळालेल्या भावात लागवड, मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेकदा शेतकरी संपूर्ण गाडीतील माल बोली लावून विकतात. असाच माल खरेदी करून तीन युवक नंदनवन चौकात विक्री करीत असल्याचे दिसून आले. दिवसभरात माल विकून अडीच ते तीन रुपये कमाई होत असल्याचे सारंग क्षीरसागर या युवकाने सांगितले.
रविवारी किरकोळ बाजारात किलो भाव :
वांगे ८ ते १० रुपये, फूलकोबी १०, पत्ता कोबी १०, कोथिंबीर १०, हिरवी मिरची २०, टमाटर २०, भेंडी १५ ते २०, कारले २० ते २५, चवळी शेंग १५ ते २०, गवार शेंग २५ ते ३०, कोहळ २०, लवकी १०, सिमला मिरची २० ते २५, तोंडले २० ते २५, परवळ २०, ढेमस ३०, मुळा १० ते १५, काकडी १० ते १५, गाजर १५ ते २०, पालक १०, मेथी १०.