नागपूर : प्रकाशयोजना, नेपथ्य, अभिनय, दिग्दर्शन, सजावट अशा रंगभूमीच्या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अष्टपैलू कलावंत व ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांचा शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.प्रतिष्ठानच्या बाबूराव धनवटे सभागृहात सायं. ६ वा. झालेल्या कार्यक्रमाला नायडू यांच्यावर प्रेम करणारी, त्यांच्या कलेप्रति आदर व्यक्त करणाऱ्या मंडळींनी एकच गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गणेश नायडू व त्यांच्या पत्नी उमा नायडू यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश अंभईकर, प्रमोद भुसारी आणि डॉ. चिंतामण देशपांडे यांनी यावेळी नायडू यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडला आणि त्यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश गांधी म्हणाले की, नायडू मुंबई, पुण्यात असते तर या क्षेत्रात ते उच्च शिखर गाठू शकले असते. पण त्यांनी नागपूर सोडले नाही. प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत त्यांनी रंगभूमीला वाहून घेतले. त्यातुलनेत मात्र त्यांच्या वाट्याला विशेष काही आले नाही. हा सत्कार त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारा आहे.अनिल देशमुख यांनीही नायडू यांच्या कलागुणांचा गौरव केला. युतीची सत्ता असताना नागपूरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमासाठी नायडू यांनी उभारलेले देखणे व्यासपीठ व तेथे केलेली विशेष प्रकाशयोजना ही कौतुकास्पद होती. सत्कारमूर्तींनाही आवडली होती. त्यांच्यामुळेच हे कार्यक्रम यशस्वी झाले, असे देशमुख यांनी आवर्जून सांगितले .कार्यक्रमाचे संचालन नितीन नायगावकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर आभार मो. सलीम यांनी मानले. कार्यक्रमाला प्रेमकुमार लुणावत, समीर सराफ यांच्यासह कला, नाटक व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अष्टपैलू कलावंताच्या कर्तृत्वाचा गौरव
By admin | Published: March 01, 2015 2:26 AM