लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक लहान मुलांना लक्षणे नसताना कोरोना होऊन गेला आहे. देशात जवळपास ६० टक्के मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे पुढे येत आहे. यामुळे कोरोनाच्या धोक्याची चिंता न करता आवश्यक खबरदारी घेत बंद असलेल्या प्राथमिक शाळा तातडीने सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय नियोनॅटॉलॉजी फोरमचे अध्यक्ष डॉ. रंजन पेजावर यांनी येथे व्यक्त केले.
‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’ व ‘राष्ट्रीय नियोनॅटॉलॉजी फोरम’च्यावतीने तीन दिवसीय ‘महानिओकॉन’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ते रविवारी ‘लोकमत’शी बोलत होते.
डॉ. पेजावर म्हणाले, सध्या भारतात विविध आजार व कारणांमुळे हजार नवजात बालकांमधून २० बालकांच्या मृत्यू होतो. २०३०पर्यंत मृत्यूची ही संख्या १० वर आणणे गरजेचे आहे. विशेषत: यात एक महिन्याच्या आतील नवजात बालकांचे मृत्यू कमी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी गर्भावस्थापासून ते प्रसूतीपर्यंत किमान चार वेळा तरी गर्भवती मातांची तपासणी होणे आवश्यक आहे.
बंद शाळांमुळे मुलांच्या मनावर खोलवर प्रभाव
‘राष्ट्रीय नियोनॅटॉलॉजी फोरम’चे सचिव डॉ. दिनेश तोमर म्हणाले, कोरोना काळात सर्वप्रथम शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलांचा सर्वाधिक वेळ व्हर्च्युअल जगात व्यतीत होत आहे. या आभासी विश्वाशी मुले लवकर जोडली गेल्याने त्याचा प्रभाव खोलवर होणारा आहे. आता अनेक गोष्टी पूर्ववत होत असताना मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी मुलांकडे विशेष लक्ष देत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शाळा सुरू करणे महत्त्वाचे आहे.
नवजात बालकांमधील दुखणे ओळखण्यावर संशोधन
बालरोगतज्ज्ञ डॉ. सोमशेखर निंबाळकर म्हणाले, नवजात बालकाला इंजेक्शन दिल्यानंतरही काही दिवस दुखणे असते. त्याला इंजेक्शन दिलेल्या जागेवर हात लावल्यावर दुखते. परंतु काही दुखणे असे असतात की ते ओळखणे कठीण असते. त्यावर संशोधन सुरू आहे. आपल्याकडे नवजात बालकांसंदर्भातील आवश्यक माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेसारख्या देशातील आकडेवारी व माहितीवर संशोधन करावे लागते. देशात संशोधनाला वाव देण्यासाठी सरकारने निधी व पायाभूत सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही डॉ. निंबाळकर म्हणाले.