नागपूर : देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संमत करण्यात आला. केंद्र व राज्य शासनांनी भाषेविषयक धोरणाचा आढावा घ्यावा व प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन या प्रस्तावांतर्गत करण्यात आले. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या या सभेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. देशविदेशातील विविध भाषांचे शिक्षण घ्यायलाच हवे. परंतु शैक्षणिक अभ्यासक्रमात मातृभाषेचे प्रचंड महत्त्व आहे. यामुळे संस्कृती, परंपरा व जीवनमूल्ये समजण्यास मदत होते. संयुक्त राष्ट्राने याची दखल घेत २१ जानेवारी रोजी मातृभाषा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, मदनमोहन मालवीय यांनीदेखील मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यामुळे शिक्षणात याला प्राधान्य द्यायला हवे अशा आशयाचा प्रस्ताव सभेत सकाळच्या सत्रात मांडण्यात आला. या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली व एकमताने हा संमत करण्यात आला. देशातील नागरिकांनी शिक्षण तसेच व्यावहारिक व सामाजिक जीवनात संवादासाठी मातृभाषेचाच उपयोग करावा. कुटुंबातील सदस्यांनी याला प्रोत्साहन द्यावे व पालकांनी याबाबत आग्रही भूमिका घ्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. सभेच्या अखेरच्या दिवशी संघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)आधुनिक तंत्रज्ञानावर भरआजच्या तारखेत संघ विस्तार योग्य दिशेने सुरू आहे. युवा पिढीला जोडण्यासाठी संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून महिन्याला तीन हजारांहून अधिक जण जोडले जात आहेत. बुद्धिजीवी वर्गाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकदेखील संघशाखांकडे वळत असल्याची माहिती सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिली.तीन वर्षांसाठी संघाची प्रमुख उद्दिष्टे> साडेसहा लाख गावांत संघशाखांचा विस्तार करणे> ग्रामविकासाच्या अधिक उपक्रम राबविणे> आदिवासी व वंचितांसाठी अधिकाधिक सेवाकार्याचे नियोजन> समाजातून भेदभाव नष्ट करणे
प्राथमिक शिक्षण मातृभाषेत द्यावे
By admin | Published: March 16, 2015 11:12 AM