नागपूर - विविध पदांवर निवड झालेल्या २,५३२ जणांना मध्य रेल्वेने रोजगाराचे नियुक्तीपत्र प्रदान केले. सरकारच्या विविध विभागात नव्याने भरती झालेल्या ७१ हजार जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज नियुक्तीपत्र प्रदान केले. देशातील विविध भागात ४५ ठिकाणी रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्तीपत्र वितरणाचा हा कार्यक्रम पार पडला. मध्य रेल्वेच्या अजनीतील कम्युनिटी हॉलमध्ये सुद्धा गुरुवारी सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड मुख्य अतिथी म्हणून, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पाण्डे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नमिता त्रिपाठी, पोस्ट मास्टर जनलर शोभा मदाले, प्राप्तीकर आयुक्त कैलाश कनौजिया, सीआरपीएफच्या कमांडंट सियाम होई चांग मेहरा प्रामुख्याने उपस्थित होते.
आज नियुक्तीपत्र मिळालेल्या उमेदवारांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी ही नियुक्ती म्हणजे तुम्हाला देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी असल्याचे सांगून भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी लक्ष्य ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन केले. आजच्या मेळाव्यात नागपूर विभागातील एकूण २०६ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यात मध्य रेल्वेेचे १३०, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे २५, प्राप्तीकर खात्याचे १६, टपाल खात्याचे ५, जनशक्ती केंद्रीय भूजल बोर्ड १ आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण १७ जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नवोदय विद्यासमिती, भारतीय माहिती संस्था आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील उमेदवारांनाही पत्र देऊन यावेळी नियुक्ती देण्यात आली.
या पदांसाठी मिळाली नियुक्ती
देशातील विविध भागांतून निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सिनिअर कमर्शिअल कम तिकीट क्लर्क स्टेनोग्राफर, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सिनिअर ड्राफ्टसमन, ज्युनिअर इंजिनिअर, सुपरवायझर आदी पदांसाठी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.