पंतप्रधान मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळाबाबत ‘या’ ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी; काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांचे आवाहन
By कमलेश वानखेडे | Published: May 27, 2023 06:30 PM2023-05-27T18:30:45+5:302023-05-27T18:33:02+5:30
Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकालात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले असून त्याची उत्तरे देण्याचे आवाहन केले आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात त्यांनी केलेल्या कामांबाबत अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांना एकामागून एक असे ९ प्रश्न विचारले. पंतप्रधानांनी आतातरी मौन सोडावे व देशाला उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गौरव वल्लभ यांच्या हस्ते पंतप्रधानांना विचारण्यात आलेल्या नऊ प्रश्नांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गौरव वल्लभ म्हणाले, राष्ट्रपती या देशाच्या पहिल्या नागरिक आहेत. मात्र, नव्या संसद भवनाचे लोकार्पण होत असताना आदिवासी असलेल्या महिला राष्ट्रपतींना का बोलाविण्यात आले नाही, असा सवाल करीत केवळ उद्घाटनाच्या फलकावर राष्ट्रपतींचे नाव प्रथम व नंतर पंतप्रधानांचे नाव येईल म्हणून राष्ट्रपतींना बोलावणे टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २० पक्षांचे प्रतिनिधी या सोहळ्याला अनुपस्थित राहले तर लोकशाहीचा हा सोहळा पूर्ण होणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना लोकार्पणासाठी बोलवावे, आम्ही सर्व विरोधी पक्ष पहिल्या रांगेत उपस्थित राहून टाळ्या वाजवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मोदी हे राजधर्म वर चर्चा न करता राजदंडावर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, अ.भा. काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा, आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, उमेश डांगे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.
असे आहे ९ प्रश्न
- १)गेल्या ९ वर्षात बेरोजगारी व महागाई एवढी का वाढली ?
२) कृषी उत्पन्न दुप्पट होणार होते ते फक्त ५ टक्केच का वाढले ?
३) अदानींच्या कंपन्यांमध्ये शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेले २० हजार कोटी कुणाचे आहेत ?
४) चीनच्या राष्ट्रपतींसोबत आजवर १८ वेळा बैठका होऊनही चीनही दीड हजार किलोमीटर भारतीय भूभागावर नियंत्रण कसे मिळविले आहे, भारतातील शहरांची नावे चीन का बदलत आहे ?
५) द्वेषाच्या राजकारणाला खतपाणी का घातले जात आहे ?
६) दलितांवरील अत्याचार २३ टक्क्यांनी का वाढले, जाती निहाय जनगनना का केली जात नाही ?
७ ) लोकनियुक्त सरकार ईडी, सीबीआयचा दबाव टाकून पाडली जात आहेत. संविधान खिळखिळे करण्याचा प्रयत्न का करताय ?
८ ) मनरेगा सारख्या जनकल्याणाच्या योजनांच्या निधीत कपात का केली ?
९ ) कोरोनात चुकीच्या नियोजनामुळे ४० लाख लोकांचा जीव गेला. त्यांच्या कुटुंबियांना भरपाईच्या रुपात मदत का दिली नाही ?