लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मतदानाचा दिवस असतानादेखील बांगलादेशमध्ये जाऊन मोदी पश्चिम बंगालबाबत भाषण देत असून, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असून मतांसाठी मार्केटिंग करत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी लावला. खडगपूर येथे एका प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
२०१९ साली लोकसभा निवडणुकांदरम्यान एक बांगलादेशी अभिनेते आमच्या रॅलीत सहभागी झाले होते. तेव्हा भाजपने तेथील सरकारवर दबाव आणून त्यांचा व्हिजा रद्द केला होता. आता पंतप्रधान एका समाजाची मते मिळावी यासाठी बांगलादेशला गेले आहेत. त्यांचा व्हिजादेखील रद्द झाला पाहिजे. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असे बॅनर्जी यांनी सांगितले.
बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी शनिवारी ओरकांडी येथे मतुआ समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली व मतुआ समाजाच्या प्रार्थनास्थळात जाऊन दर्शन घेतले. येवळी त्यांनी तेथील लोकांना संबोधितदेखील केले. यावरच ममता यांनी आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये ५०हून अधिक जागांवर मतुआ समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे.