आशिष रॉय
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ९,६८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम जवळपास पूर्ण होत असून, उर्वरित बांधकाम २० जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली. प्रकल्पाच्या बांधकामाच्या पूर्णत्वानंतर महामेट्रो निरीक्षणासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना आमंत्रित करेल आणि आयुक्ताकडून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर महामेट्रो नवीन मार्गावर मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागेल. या प्रक्रियेनंतरच सर्व मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य विशेष अतिथी ऑगस्ट अखेरपर्यंत वा सप्टेंबर महिन्यात नागपूर मेट्रोचे रिच-२ (कामठी रोड) आणि रीच-४ चे (सेंट्रल एव्हेन्यू) उद्घाटन करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यासह पंतप्रधानांच्या हस्ते फुटाळा फाउंटेन प्रकल्प आणि जयस्तंभ वाहतूक प्रकल्पाच्या एका भागाचे उद्घाटन करतील.
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रिच-४ करिता प्रमाणपत्र दिले होते. पण आयुक्तांनी मार्गात काही सुधारणा करण्यास सांगितले होते. आता ही कामेही पूर्ण झाली आहेत. रिच-२ आणि रिच-४ मध्ये काही तुरळक कामे करण्यात येत आहेत. ती २० जुलैपर्यंत पूर्ण होतील. रिच-२ मध्ये रूळ टाकण्याचे काम यावर्षी मार्च महिन्यात पूर्ण झाले आहे. दीक्षित आणि त्यांच्या चमूने २९ मार्चला सीएमव्ही वाहनावर स्वार होऊन सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत निरीक्षण केले होते. रिच-२ मध्ये सीताबर्डी ते कस्तुरचंद पार्कचा मार्ग ऑगस्ट २०२१ मध्ये खुला करण्यात आला होता.
मे २०१५ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू
नागपूर मेट्रो प्रकल्पाचे काम मे २०१५ मध्ये सुरू झाले. रिच-१ (वर्धा रोड) मार्ग मार्च २०१९ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर रिच-३ (हिंगणा रोड) जानेवारी २०२० मध्ये सुरू झाला. कोविड महामारीमुळे बांधकामावर विपरीत परिणाम झाला आणि रिच-२ व रिच-४ चे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. नागपूर मेट्रोमध्ये दररोज सरासरी प्रवासी संख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. रिच-२ आणि रिच-४ मार्ग सुरू झाल्यानंतर ही संख्या १.५० लाखांवर जाण्याची अपेक्षा आहे.