लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासोबत रोजगार निर्मितीचे दालन खुले व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने १०० दिवसीय राष्ट्रस्तरीय ‘पीएसबी लोन इन ५९ मिनिट’ या आॅनलाईन पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात नागपूर अन्न प्रक्रिया युनिटच्या आॅनलाईन पोर्टलचे लोकार्पण करण्यात येईल तसेच पंतप्रधाननरेंद्र मोदी लघु उद्योजकांशी थेट संवाद साधतील, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त सचिव वेन्नेलागंटी राधा यांनी दिली.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात गुरुवारी याबाबत पूर्व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, एमएआयडीसी चे विभागीय व्यवस्थापक डॉ. अनिल मोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आनंद काटोले, सीए मिलिंद कहाडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक शरद बारापात्रे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शरद कोलते. अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सुनील सुर्वे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.