नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२३ च्या पहिल्याच आठवड्यात नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली १०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या याच दौऱ्यादरम्यान समृद्धी महामार्ग तसेच सीताबर्डी ते प्रजापती नगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठाच्या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त नागपुरात ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे भारतातील प्रमुख शहरांमध्ये हे आयोजन होते. याला देशाच्या पंतप्रधानांची उपस्थिती असते. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण पाठविण्यात आले होते. त्यांनी येण्यास मंजुरी दिली आहे.
या दौऱ्यासंदर्भात विभागीय आयुक्त राजलक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू एस. आर. चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, उपायुक्त आशा पठाण, प्रदीप कुलकर्णी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलीस उपायुक्त एम. सुदर्शन, निरीच्या मुख्य संशोधक पद्मा राव, निरीच्या विज्ञान सचिव डॉ. रिटा दोदाफकर, मनपाचे अभियंता वाईकर, विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी. एस. खडेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या आयोजनाचे स्थळ, तेथील व्यवस्था, सुरक्षाव्यवस्था, देश-विदेशातून येणारे संशोधक आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.
नागपूर विद्यापीठातील दुसरी ‘सायन्स काँग्रेस’
यापूर्वी नागपूरमध्ये १९७४ मध्ये ६१ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा १४ विविध विभागांवर नवनवीन शोधप्रबंध यात सादर करण्यात येतील. तसेच भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे. या संमेलनामध्येच राष्ट्रीय किशोर विज्ञान संमेलनदेखील घेण्यात येते. यासाठी किशोर वैज्ञानिकही नागपूर येथे मुक्कामी असतील.