इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल
By कमलेश वानखेडे | Published: June 1, 2024 12:48 PM2024-06-01T12:48:07+5:302024-06-01T12:48:31+5:30
विजय वडेट्टीवारी यांचा दावा : राहुल गांधी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा
नागपूर : इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होईल ही काळा दगडावरची पांढरी रेख आहे. भाजप सत्तेतून बाहेर गेलेला दिसेल. इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आणि तो पंतप्रधान कोण व्हावा तर माझे नेते राहुल गांधी व्हावे असे मला वाटते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, इंडिया आघाडीची मोट बांधून आम्ही लढलो. खोटारडे सरकारच्या विरोधात आम्ही लढलो. निकाल आमच्या बाजूने लागेल. इंडिया आघाडीत जी काही चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये जे नाव पुढे येईल तो इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल.
महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होईल, यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुद्धा आहे. हे रिपोर्ट्स आहे. किती पैसे लावले असले तरी भाजप निवडून येणार नाही. भाजपच्या विरोधात मतदान केल. महाराष्ट्रात भाजपपेक्षा पेक्षा जास्त जागा इंडियाआघाडी जिंकेल, असा दावा त्यांनी केला.
महादेव जानकर हे स्वतःच पराभूत होत आहे. कदाचित त्यांची स्टेप चुकली. ते जर आमच्या सोबत असते खासदार दिसले असते दुर्दैवाने त्यांचे पाउल चुकलं. पाऊल चुकल्यानंतर बोलावं लागतं, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. सुनील तटकरे यांनाच विचारा पराभव नंतर ते कुठे जाणार आहे, असे म्हणत त्यांनी चिमटा काढला.
जरांगे पाटील यांच्या बाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कोण किती जागा लढवाव्यात तो त्यांचा अधिकार आहे. जनता ठरवेल त्यांना कितपत साथ द्यायची. तो येणारा काळ ठरवेल आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही राजकीय पक्ष काम करत आहे. नवीन पक्ष काढून लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे.