३६ वाहनांचा काफिला : आठ वाहने एकसारखी, दोन अगदी वेगळी नरेश डोंगरे नागपूरतीन वेगवेगळ्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नागपुरात तब्बल ५० किलोमीटर अंतराचा मोटार प्रवास करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात वेगवेगळ्या ३६ वाहनांचा काफिला (कॅन्वाय) राहणार आहे. त्यात आठ विशेष वाहनांचाही समावेश असून ही आठही वाहने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने खास दिल्लीहून नागपुरात आली आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली वगळता देशात अन्य ठिकाणी (सडक मार्गे) दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात ३३ ते ४० वाहनांचा काफिला असतो. नागपूर विमानतळ ते कोराडी मार्गाचे अंतर २५ किलोमीटर आहे. नागपूरला शुक्रवारी, १४ एप्रिलला दौऱ्यावर येणारे पंतप्रधान मोदी विमानतळावरून दीक्षाभूमी, तेथून कोराडी, तेथून मानकापूर आणि त्यानंतर परत विमानतळ असा येण्या-जाण्याचा तब्बल ५० किलोमीटरचा मोटार प्रवास करणार आहेत. या प्रवासात त्यांच्या काफिल्यात ३६ वाहने राहतील. त्यातील ८ ते १० वाहने एकाच रंगाची राहणार असून, ही सर्व वाहने खास दौऱ्याच्या निमित्ताने दिल्लीहून नागपुरात पोहचली आहेत. या वाहनांचे बाह्य स्वरूप सारखे दिसत असले तरी त्यातील दोन वाहने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असतील. त्यातील कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून सुरक्षित असलेल्या(जॅमरयुक्त) रेंज रोव्हरमध्ये पंतप्रधान मोदी असतील. विशेष म्हणजे, आठ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणी पंतप्रधानांसाठी सुरक्षा यंत्रणा हेलिकॉप्टरची व्यवस्था करतात. यावेळीही येथील विमानतळावर खास हेलिकॉप्टर सज्ज राहणार आहेत. मात्र, ती वापरण्याऐवजी कार्यक्रमस्थळी जाण्या-येण्याचा तब्बल ५० किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदी मोटारीनेच करणार असल्याचे गुरुवारी रात्रीपर्यंतच्या सुरक्षा यंत्रणांनी निश्चित केले होते. अपवादात्मक स्थितीत ऐनवेळी त्यात बदलही होऊ शकतो, असेही संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. या दौऱ्यात वाहनांची संख्या कमी करण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्स (छोट्या बस) चा वापर करण्यात येणार आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य !
पंतप्रधान करणार ५० किलोमीटरचा प्रवास
By admin | Published: April 14, 2017 3:00 AM