नागपूर : नागपूर-बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधाने रेल्वे अधिकारी स्पष्ट बोलत नसले तरी तशी तयारी मात्र जोरात सुरू आहे.
१३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी नागपूर - बिलासपूर - नागपूर वंदे भारत ट्रेन शनिवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. त्यासंबंधीची योजना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून यापूर्वीच तयार केली आहे. या ट्रेनसाठी दुसऱ्या पाच रेल्वेगाड्यांच्या संचालनाच्या वेळेत आवश्यक ते संशोधन आणि बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदी नागपुरात येत आहेत. ते येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. या पूर्वनियोजित कार्यक्रमासोबतच ते नागपूर स्थानकावरून वंदे भारतला हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त दिल्लीतून दोन दिवसांपूर्वी नागपुरात धडकले. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि अवघ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, गुप्तचर यंत्रणांनी रेल्वे स्थानक तसेच आजूबाजूचा परिसर पिंजणे सुरू केले आहे. तर, तिकडे पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्यासह डझनभर पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा मंगळवारी दुपारी रेल्वे स्थानकावर पोहोचला. त्यांनी रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन केले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकही पोहोचले
थेट पंतप्रधानच ग्रीन सिग्नल देणार असल्याचा निरोप आल्याने अवघे रेल्वे प्रशासनही तयारीला लागले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी हे आज नागपुरात पोहोचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या बैठकीत या संबंधाने दिशानिर्देश दिले. दरम्यान, या संबंधाने माहिती जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता त्यांनी अधिकृत कार्यक्रम ठरला नसल्याने या संबंधाने काही बोलणे योग्य होणार नसल्याचे म्हटले.
----