नागपूर : १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाचे यजमानपद मिळाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ जानेवारी रोजी उद्घाटन होणार होते. परंतु पंतप्रधान या कार्यक्रमाला प्रत्यक्षात उपस्थित राहणार नसून ते ‘ऑनलाइन’ मार्गदर्शन करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा यंत्रणांकडूनदेखील त्यांच्या दौऱ्याबाबत कुठलीही तयारी झालेली नाही हे विशेष.
३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमाला नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधानांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते. मात्र पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला अधिकृत सूचना देण्यात आलेली नसली तरी सुरक्षा यंत्रणांकडून त्यासंदर्भातील संकेत देण्यात आले आहेत. सर्वसाधारणत: पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या एक आठवड्याअगोदरपासून सुरक्षा यंत्रणांकडून हालचाली सुरू होतात. कार्यक्रमस्थळाची विस्तृत पाहणी करून सुरक्षेचे नियोजन करण्यात येते. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांनी यासाठी पुढाकार घेतलेला नाही. विशेष म्हणजे ‘एसपीजी’चे पथकदेखील आढावा घेण्यासाठी पोहोचलेले नाही. नागपूर पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी केवळ एक तंबू ठोकण्यात आला असून तेथे अंबाझरी पोलीस ठाण्याचे काही जवान तैनात करण्यात आले आहेत. एकूण स्थिती पाहता पंतप्रधान प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येण्याबाबत अगोदरपासूनच होती साशंकता
पंतप्रधानांच्या आईचे शुक्रवारी निधन झाले. त्यामुळे ते येणार की नाहीत, अशा चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाकडून ऑनलाइन उपस्थितीबाबत त्या अगोदरपासूनच ठरविण्यात आले होते. दरम्यान, जनसंवाद विभागातील डॉ.धर्मेश धवनकर यांच्या प्रकरणाची तक्रार करणारे पत्र विद्यापीठ वर्तुळातून पंतप्रधान कार्यालयाकडे गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत बोलण्यास नकार दिला असला तरी अनौपचारिकपणे बोलताना असे झाले असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.