लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगल हे वाघाचे राज्य. तसा कुठेही असला तरी वाघाचा रुबाब असतोच पण जंगलात असला की तो राजा असतो. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आणलेल्या ‘राजकुमार’लाही त्याचे राज्य मिळाले. आणल्यानंतर तो पिंजऱ्यात होता. शनिवारी त्याला गोरेवाडा जंगलात मुक्त करण्यात आले. पिंजऱ्यातून बाहेर पडताच आपले राज्य ताब्यात घेण्यासाठी तो रुबाबात निघाला.
वन्यप्रेमींच्या पर्यटनासाठी गाेरेवाड्याच्या २५ हेक्टरच्या क्षेत्रामध्ये आपल्याच प्रकारे टायगर सफारी क्षेत्र तयार करण्यात आले आहे. वन्यजीव इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण या २५ हेक्टरच्या सफारी क्षेत्रात राजकुमारला मुक्त करण्यात आले. राजकुमारला काही दिवसांपूर्वीच गाेरेवाड्याच्या वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले हाेते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर राजकुमार वाघाला सफारी क्षेत्रात साेडण्यात आले. प्राण्यांना जंगलात साेडले जाते पण एखाद्या तयार केलेल्या सफारीमध्ये वाघाला साेडण्याची ही पहिलीच घटना ठरली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, एफडीसीएम के प्रबंध संचालक एन. वासुदेवन, एफडीसीएमचे महाप्रबंधक ऋषिकेश रंजन यावेळी उपस्थित हाेते.
राजकुमारला मुक्त केल्यानंतर लवकरच इतर प्राण्यांनाही या सफारी क्षेत्रात साेडण्यात येणार आहे. ली नामक वाघिणीसह ७ बिबट व ६ अस्वलांनाही सफारी क्षेत्रात लवकरच मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती गाेरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक पी.बी. पंचभाई यांनी दिली. गाेरेवाडा टायगर सफारी क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.