नागपूर - नागपूर शहराला हादरवून सोडणा-या प्राचार्य मोरेश्वर महादेवराव वानखेडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलीने आणि पत्नीनेच मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विदर्भातील विविध भागातून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती.
चंद्रपुरात नोकरी करणा-या मोरेश्वर वानखेडे यांची शुक्रवारी पहाटे बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाली. मारेक-यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला धडक मारली आणि नंतर त्यांचा गळा धारदार शस्त्राने कापला. या थरारक हत्याकांडामुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. ते चंद्र्रपूर (तुकूम) मधील खत्री महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवारत होते.नागपुरातून ते येणे-जाणे करीत होते.
भल्या सकाळी ते दुचाकीने रेल्वेस्थानकावर जायचे आणि तेथून ते रेल्वेने चंद्रपूरला जायचे. रात्री ७.३० च्या सुमारास ते परत येत होते. नरेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीत प्रा. वानखेडे राहायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे ४ वाजता ते घरून दुचाकीने रेल्वेस्थानकाकडे निघाले. छत्रपती चौकातून ते नीरीमार्गे रेल्वेस्थानकाकडे जात होते. ४.४५ वाजता नीरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या दुचाकीला हल्लेखोरांनी धडक मारली.
हल्लेखोरांनी त्यांना कसलीही संधी न देता धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून पळ काढला. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने मॉर्निंग वॉक करणाºयांनी नियंत्रण कक्षाला कळविले. त्या माहितीवरून प्रारंभी धंतोली आणि नंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वानखेडे यांना बघितले असता ते मृतावस्थेत आढळले. मारेकºयांनी त्यांचा गळा कापला होता. पोलिसांनी त्यांना मेडिकलमध्ये नेले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी कळवले. एका प्राचार्याची हत्या झाल्याचे वृत्त पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली.