नागपूर : इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारले जात आहे. यात बाबासाहेबांच्या ३५० फुट उंच पूर्णकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. या प्रतिकात्मक पुतळ्याच्या प्रतिकृतीला अंतिम करण्यासाठी नवी दिल्ली येथे समितीचा पाहणी दौरा गुरुवारी पार पडला. या समितीला प्रतीकृती आवडली असून त्यांनी याला तत्वत: मान्यता प्रदान केली आहे.
इंदू मिलवर तयार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुट उंच पूर्णकृती पुतळ्याचे काम प्रसिद्ध मूर्तीकार डॉ. राम सुतार यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात सुतार यांनी त्यांच्या शिल्प कारखाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा २५ फूट उंच पूर्णकृती पुतळ्याची प्रतीकृती उभारली आहे. ही प्रतिकृती अंतिम करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली. या समितीने ५ व ६ एप्रिल रोजी दिल्ली येथे जाऊन त्याची पाहणी केली. यावेळी सुतार मूर्तीकार डॉ. राम सुतार व आनंद सुतार यांनी शिल्पकृतीचे सादरीकरण केले. सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे यांनी स्मारक बांधकमाची माहिती दिली. समितीने या प्रतिकात्मक प्रतीकृतीला तत्वत: मान्यता देत शिल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच स्मारक परिसरात २ हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकुलीत सभागृह तयार करावी, अशी सूचनाही केली.
या समितीमध्ये भंते राहुल बोधी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी राज्यमंत्री एड. सुलेखा कुंभारे, रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई, आ. संजय बनसोडे, आ. यामिनी जाधव, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सहायक आयुक्त अनिल अहीरे प्रामुख्याने उपस्थित होते.