लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण जगाला प्रतीक्षा असणारी कोरोना आजारावरील लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती सर्वप्रथम आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठीचे प्राथमिक नियोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले असून, त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, वेगवेगळ्या हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील या बैठकीत सहभागी झाले होते. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेने यासंदर्भात दिलेल्या दिशानिर्देशानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे या संपूर्ण लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी आहेत.
या मोहिमेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक हे राष्ट्रीय स्तरावर नोडल अधिकारी असतील. यासाठी लवकरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाची नोंद करण्याचे काम सुरू होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने कालमर्यादेत सर्व माहिती संगणकावर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे.
सेवा देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांची माहिती शासकीय-निमशासकीय खासगी आरोग्य संस्था, वैद्यकीय व्यावसायिक अशा गटातून मागितली जाणार आहे. जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जाणार आहे.