लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा अंघोळ करताना घसरून पडल्याने मृत्यू झाला. वसई, पालघर येथील रहिवासी असलेला बबलू शम्भू यादव (वय ४०) असे या कैद्याचे नाव आहे.तो चिंचपाडा, वसई (पालघर) येथील रहिवासी होता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात त्याला पोक्सो कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला ठाणे कारागृहातून कोरोना प्रकोपापूर्वी नागपूर कारागृहात आणले होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी ८.३० च्या सुमारास तो अन्य कैद्यांसोबत हौदाजवळ अंघोळ करीत असताना घसरून पडला. बबलूच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याला मेडिकलला पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी धंतोली पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुढील तपास सुरू आहे.
कैद्याची होणार कोरोना टेस्टसध्या येथील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे; त्यामुळे मृत बबलू यादव याची आधी कोरोना टेस्ट केली जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याचे विच्छेदन होईल, त्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सोपवला जाईल, अशी माहिती धंतोली पोलिसांनी दिली. दरम्यान, कारागृह प्रशासनाने तसेच पोलिसांनी पालघर जिल्हा पोलिसांना यादव याच्या मृत्यूचे वृत्त कळविले आहे. तो आजारी होता आणि आज सकाळी अंघोळ करताना अचानक खाली पडून डोक्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे.