ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 - खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला शामल दिनेश बिश्वास ( ४१) नामक कैदी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेला. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामी लागली आहे.मुळचा पश्चिम बंगालमधील उत्तर (२४) परगणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला शामल दहा वर्षांपुर्वी मुंबईत राहत होता. त्याने त्याच्या मेव्हणीची हत्या केल्याने त्याला सायन पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते. २००७ मध्ये कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही दिवस मुंबई कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर त्याला कोल्हापूरच्या कारागृहात ठेवण्यात आले. २०१६ मध्ये त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. येथे त्याचे वर्तन चांगले असल्यामुळे त्याला खुल्या कारागृहात पाठविण्यात आले. नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी ईतर कैद्यांसोबत तो कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर आला आणि शेतात काम केले. दुपारी १२ च्या सुमारास जेवणासाठी तो पुन्हा आत गेला. जेवण वाढून घेतल्यानंतर तो दिसेनासा झाला. अर्धा तास झाल्यानंतर शामल दिसत नसल्याने त्याच्या सोबतच्या कैद्यांनी तुरूंगाधिका-यांकडे तक्रार केली. त्यानंतर शामलची शोधाशोध सुरू झाली. तो कुठेच आढळला नाही. शामल पळून गेल्याचे लक्षात आल्यामुळे दुपारी ३ च्या सुमारास धंतोली ठाण्यात माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करून बसस्थानक, रेल्वेस्थानकासह ठिकठिकाणी शामलचा शोध घेणे सुरू केले. दुपारी ४ वाजेपर्यंत शामलचा शोध लागला नव्हता. तिकडे कारागृह प्रशासनात शामल पळून गेल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
नागपूर कारागृहातून कैद्याचे पलायन
By admin | Published: February 27, 2017 4:56 PM