लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मेडिसीन अपघात विभागात उपचारासाठी आलेला एक कैदी रविवारी दुपारी ५.४० वाजता दरम्यान पळून गेल्याने खळबळ उडाली.मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला मजीद अली (२८) या कैद्याला दुपारी ४ वाजता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मेडिकलच्या अपघात विभागात दाखल केले. छातीत दुखणे, हगवण व उलटी होत असल्याची त्याची तक्रार होती. निवासी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचाराला सुरुवात केली. परंतु दीड तासानंतर तो बेडवर नसल्याचे दिसून येताच, धावाधाव सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत कैदी पोलिसांंना सापडला नव्हता. विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एमएसएफचे जवान तैनात असतात. मेडिकलचे यांच्यावर लाखो रुपये खर्च होतात. परंतु बहुसंख्य सुरक्षा रक्षकाचे लक्ष त्यांच्या मोबाईलमध्येच जास्त असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.