गणेश खवसे/ लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सर्वत्र धास्तीचे वातावरण तयार झालेले आहे. नागपुरात कलम १४४ लागू केले असून, जमावबंदी आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी वारंवार हात धुणे, गर्दी न करणे हा उपाय सांगितला जातो. अशाचप्रकारे कैद्यांमध्येही जनजागृती होण्यासाठी ‘क्या है कोरोना, इससे कैसे बचा जाये’ या आणि अशाप्रकारचे संदेश आता कैद्यांना मिळू लागले आहे. होय, हे खरे आहे. मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून चालविण्यात येणाऱ्या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक गाण्यानंतर हा संदेश देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कैद्यांद्वारेच केवळ कैद्यांसाठी ‘नागपूर सेंट्रल प्रिझन’ कम्युनिटी रेडिओ चालविण्यात येत आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनातर्फे सकाळी ८ ते सायंकाळी ४.३० वाजतापर्यंत कम्युनिटी रेडिओचे प्रसारण केले जाते. या काळात सर्वप्रथम विपश्यना सांगितली जात असून, त्यानंतर भक्तिसंगीताचा कार्यक्रम नियमितपणे होतो. त्यानंतर मराठी-हिंदी गीतांचे प्रसारण केले जाते. यासाठी कैदीच सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडतो. या कार्यक्रमात खंड पडलेला नाही. मात्र आता त्यात थोडा बदल करण्यात आला आहे. भक्तिगीतांचा कार्यक्रम संपताच सुरू होणाऱ्या गीतांच्या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक गीतानंतर एक संदेश कैद्यांच्या कानी पडतो. ‘क्या है कोरोना, इससे कैसे बचा जाये’ असे हिंदी आणि त्यानंतर मराठीतही जनजागृतीपर संदेश ऐकू येऊ लागले आहेत. हा बदल गुुरुवारपासून करण्यात आला आहे. कैद्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, खोकला-ताप आदी लक्षण सांगून सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबणाने वारंवार हात धुणे असे खबरदारीचे उपाय सांगितले जात आहे.कम्युनिटी रेडिओ म्हणजे?साधारणत: १० ते १५ किंवा त्यापेक्षा कमी परिघात ऐकू येणाऱ्या रेडिओला कम्युनिटी रेडिओ असे संबोधले जाते. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याने २०१२ सालापासून, समाजोपयगी कार्य करणाऱ्या शासकीय तथा गैरशासकीय संस्थांना त्यांच्या परिक्षेत्रातील, समाजातील दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, छोट्या प्रसारण क्षमतेचे रेडिओ स्टेशन सुरू करण्याचे परवाने जारी केले. त्यानुसार विविध संस्था, कंपनी आदी ठिकाणी कम्युनिटी रेडिओ सुरू आहेत. मध्यवर्ती कारागृहातही अशाप्रकारे कम्युनिटी रेडिओचे प्रसारण केले जात असून, कैद्यांकडून चालविण्यात येणारे हे स्टेशन केवळ कैद्यांसाठीच आहे.कैद्यांसाठी इतरही सुविधाकेवळ जनजागृतीवरच मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचा भर नसून, कैद्यांना इतरही सुविधा देण्यात येत असल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कैद्यांच्या अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था तीनदा केली जात आहे. अंघोळीचे कपडे गरम पाण्यातून काढण्याची व्यवस्थाही केली असून सॅनिटायझर, साबण, हॅन्डवॉशची व्यवस्था करण्यात आली आहे. २४ तास डॉक्टरची चमू लक्ष ठेवत असून लॅबचीही व्यवस्था आहे.प्रशासन सज्जकम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून कैद्यांमध्ये जनजागृती केली जात असून, विविध संदेश आता कैद्यांच्या कानी पडू लागले आहे. दक्षता, खबरदारी, लक्षणाबाबत संदेश प्रसारित केले जात आहेत. यासोबतच कैद्यांच्या अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी गरम पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मध्यवर्ती कारागृह प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, डॉक्टरांची चमूही लक्ष ठेवून आहे.अनुपकुमार कुमरे,कारागृह अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नागपूर.