योगेश पांडे
नागपूर : राज्यात लहान-मोठी ६० कारागृहे असून, ही संख्यादेखील कमी पडते आहे. कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, मोठ्या कारागृहांची स्थिती आणखी गंभीर आहे. राज्यातील सर्व कारागृहे मिळून सरासरी ६५ टक्के अधिक कैदी आहेत. तर मुंबई, ठाणे, येरवडा मध्यवर्ती कारागृहात तर दुप्पट ते चौपट कैदी आहेत. ही आकडेवारी पाहता, ही कारागृहे आहेत की कोंडवाडा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे असून, २८ जिल्हा कारागृहे आहेत. याशिवाय विशेष कारागृहे, खुली कारागृहे मिळून हा आकडा ६० इतका होतो. सर्व कारागृहे मिळून कैद्यांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात ३० नोव्हेंबरअखेरीस ४० हजार ७१८ कैदी कारागृहात होते. क्षमतेपेक्षा हा आकडा ६४.७० टक्क्यांनी अधिक आहे.
मोठ्या कारागृहांवर प्रचंड ताण
मध्यवर्ती कारागृहांमध्ये नाशिकरोड कारागृह वगळले, तर सगळीकडेच क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. मुंबई, ठाणे, येरवडा मध्यवर्ती कारागृहावर प्रचंड ताण आहे. तेथे अनुक्रमे ३२५ टक्के, २८८ टक्के व १८० टक्के अधिक कैदी आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा ५६ टक्के अधिक कैदी आहेत. क्षमतेपेक्षा इतक्या जास्त प्रमाणात कैदी असल्याने कारागृह प्रशासनांवर प्रचंड ताण येत आहे. कैद्यांचे भोजन, कपडे व इतर सुविधा पुरविताना प्रशासनाची चांगलीच कसरत होत असल्याचे चित्र आहे.
महिला कैद्यांची संख्या २३ टक्क्यांनी अधिक
राज्यातील सर्व कारागृहांत महिला कैद्यांसाठीची क्षमता १ हजार ३२० इतकी आहे. प्रत्यक्षात १ हजार ६२४ महिला कारागृहात आहेत. महिला कारागृहांतदेखील क्षमतेपेक्षा २३ टक्के अधिक कैदी आहेत.
कारागृहांमधील कैद्यांची संख्या
मध्यवर्ती कारागृह : एकूण क्षमता : प्रत्यक्ष कैदी
तळोजा : २,१२४ : २,९२३
ठाणे : १,१०५ : ४,२९१
मुंबई : ८०४ : ३,४२१
येरवडा : २,४४९ : ६,८५४
कोल्हापूर : १,७८९ : १,९८४
नाशिकरोड : ३,२०८ : २,८७२
औरंगाबाद : १,२१४ : १,६०२
नागपूर : १,८४० : २,८७९
अमरावती : ९७३ : १,३७५
कारागृहनिहाय कैदीसंख्या
कारागृहांचा प्रकार : : एकूण क्षमता : प्रत्यक्ष कैदी
मध्यवर्ती कारागृह : १५,५०६ : २८,२०१
जिल्हा कारागृह : ६,९६३ : १०,४२७
विशेष कारागृह : २४६ : २०२
महिला कारागृह (मुंबई) : २६२ : ३६३
किशोर सुधारालय : १०५ : ००७
खुले कारागृह : १,६१२ : १,५०६
इतर कारागृह : २८ : १२