सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने सर्व खासगी इस्पितळांना केवळ गंभीर आजाराचे रुग्णच पाहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अनेक हॉस्पिटलने आपली ‘ओपीडी’ बंद करून आकस्मिक विभागच सुरू ठेवला आहे. काही इस्पितळांच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकच रुग्णांच्या आजाराची माहिती घेऊन रुग्णालयात प्रवेश देत असल्याचे चित्र आहे. रुग्णाने सर्दी, खोकला अशी लक्षणे सांगितल्यास त्याला मेयो, मेडिकलमध्ये पिटाळून लावले जात आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोनाच्या भीतीमुळे अनेक छोटे क्लिनिक बंद झाले आहेत. सामान्य रुग्णांवर अंगावर आजार काढण्याची किंवा स्वत:हून औषधे घेऊन उपचार करण्याची वेळ आली आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात जिल्हा प्रशासन व शासकीय आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. परंतु बहुसंख्य खासगी इस्पितळांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत चालला आहे. त्यांच्याकडे आधीच कोरोना संशयित व बाधित रुग्णांची जबाबदारी त्यात या रुग्णांची भर पडत असल्याने डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत कामाचा ताण पडला आहे. यातच विदर्भ असोसिएशनने २० मार्च रोजी एक पत्र काढून कोरोना खासगी हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये होत असलेली गर्दी टाळण्यासाठी ओपीडी बंद ठेवण्याचे व अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. सोबतच तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, असेही सुचविले होते. यामुळे काहींनी कोरोनाची लागण होण्याच्या भीतीमुळे इस्पितळे बंद केली, काहींनी ओपीडी बंद करून आकस्मिक विभाग सुरू ठेवले तर काहींनी मोजक्याच रुग्णांसाठी इस्पितळे सुरू ठेवली आहेत. परिणामी, सामान्य रुग्ण अडचणीत आला आहे. मेयो, मेडिकलमध्ये कोरोना विषाणूचे संशयित व बाधित रुग्ण असल्याने त्याची लागण होण्याची भीतीमुळे तिथेही रुग्ण जाण्याचे टाळत आहेत. यामुळे काही रुग्ण औषधी दुकानातून औषधी घेऊन तात्पुरता उपाय करीत आहेत. परंतु हे धोकादायक आहे._- ओपीडी बंद ठेवल्यास होणार कारवाईखासगी इस्पितळांनी ओपीडी किंवा हॉस्पिटल बंद ठेवल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्टÑ कोविड उपाययोजना नियम २०२० व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यात इंडियन मेडिकल कौन्सिलकडे तक्रार नोंदवून इस्पितळाची नोंदणी रद्द करण्याची, तसेच सक्षम प्राधिकरणास कळविण्यात यावे, अशाही सूचना आहेत.__-तुम्ही तुमचा निर्णय घ्या, असे आवाहन केले होतेकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओपीडीतील गर्दी टाळण्याचे व अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. सोबतच तुम्ही तुमचा निर्णय घ्या, असेही सुचविले होते. ओपीडी बंद ठेवण्यामागे आणखी काही कारणे असावीत. कोरोनाची लागण होण्याची दहशत, ‘एन ९५ मास्क’, ‘पीपीई किट’चा अभाव किंवा या वस्तू बाजारभावापेक्षा जास्त किमतीत मिळत असाव्यात, वेळेवर उपलब्ध होत नसाव्यात, संशयित म्हणून पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याची भीती, लॉकडाऊनमुळे हॉस्पिटलमधील परिचारिका व कर्मचाºयांना येणे-जाणे अवघड होणे आदीचीही शक्यता आहे. शासनाने बंदमागील कारणे तपासून घ्यावीत. तसेच सर्दी, खोकला व तापाचा किंवा संशयित रुग्ण विना प्रोटेक्शन किट तपासू नये, असे आवाहनही करीत आहे.-डॉ.अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन__- शासनाने हॉस्पिटलना मदत करावीकोरोनाची भीती, ‘एन ९५’ मास्क, सॅनिटायझर व पीपीई किटचा तुटवडा आणि ‘लॉकडाऊन’मुळे ५० टक्के कर्मचाºयांना रहदारीची समस्या निर्माण झाल्याने काही हॉस्पिटल बंद तर काहींवर ओपीडी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शासनाने या हॉस्पिटलना मदत करावी. तसेच ज्यांच्याकडे या समस्या नाहीत त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हॉस्पिटल सुरू ठेवावे._- डॉ. कुश झुनझुनवाला, अध्यक्ष, आयएमए