लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेची पाच रुग्णालये अद्ययावत केल्याचे सांगितले होते. दुर्दैवाने या रुग्णालयाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शिवाय मनपा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे येथे एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कोरोना रुग्णांनी खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे मेयो, मेडिकल रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्यानंतरही रिकामे नसल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.
सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यात आला. शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल रुग्ण व बेडची उपलब्धता या याबाबतची माहिती घेण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी शहरातील कोरोना रुग्ण तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती सादर केली. यात महापालिकेच्या एकाही रुग्णालयाचा समावेश नव्हता. महापालिकेच्या रुग्णालयात ५०० बेडची व्यवस्था असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले होते.
दरम्यान, त्यांनी या कामाच्या निविदा न काढता ई-मेलच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविली होती. घाईघाईच्या या निर्णयामुळे या रुग्णालयाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मेडिकल, मेयो येथे अर्धेअधिक बेड रिकामे असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याचे झलके यांनी सांगितले.महापालिकेच्या रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल नाही. रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच रुग्णालये सज्ज असल्याचा मोठा गाजावाजा केला होता. दुर्दैवाने मनपाचे एकही रुग्णालय अद्ययावत झाले नाही. याव्यतिरिक्त राधास्वामी सत्संग मंडळातील बेडदेखील इतरत्र हलविण्यात आले आहेत.- पिंटू झलकेस्थायी समिती अध्यक्ष, मनपा