लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठांच्या ‘कोरोना’ लसीकरणाला गुरुवारपासून आणखी गती येण्याची शक्यता आहे. १३ सरकारी इस्पितळांसोबतच १७ खासगी इस्पितळांतदेखील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बुधवारी सात खासगी इस्पितळांत लस देण्यात आली, तर आणखी दहा इस्पितळांना मंजुरी प्रदान करण्यात आली. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ६० वर्षांवरील दोन हजार ७६५, तर ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या (गंभीर आजाराने ग्रस्त) ४८७ लाभार्थींना लस टोचण्यात आली.
लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत आहे. शहरातील १९ केंद्रांवर ६० वर्षांहून अधिक वयाच्या एक हजार ८३३ व ४५हून अधिक वयाच्या ३२४ लाभार्थींचे लसीकरण झाले तर ग्रामीणमधील १७ केंद्रांवर ६० वर्षांहून अधिक वयाच्या ९३२ व ४५हून अधिक वयाच्या १६३ जणांना लस टोचण्यात आली.
उपराजधानीत १४ सरकारी केंद्रांसोबतच पाच खासगी इस्पितळांतील केंद्रांत लसीकरण सुरू झाले. खासगी इस्पितळांत ६०हून अधिक वयाच्या पाचशे व ४५हून अधिक वयाच्या १२७ जणांना लस टोचण्यात आली. गुरुवारी १७ खासगी इस्पितळांत लसीकरण सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे वेग वाढेल, अशी चिन्हे आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व बर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालयात मंगळवारी लसीकरणाची परवानगी मिळाली.
२४ बाय ७ लसीकरणाचा आदेश मिळालेला नाही
गुरुवारी एकूण १७ खासगी इस्पितळांत लसीकरणाची सुरुवात होईल. यातील पाच इस्पितळांना दोन दिवसांअगोदरच परवानगी देण्यात आली होती. उर्वरित १२ खासगी इस्पितळांत ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. २४ बाय ७ लसीकरणासंदर्भात अद्याप कुठलेही दिशानिर्देश प्राप्त झालेले नाहीत. शहरात हळूहळू खासगी इस्पितळांना लसीकरणाची परवानगी देण्यात येईल, असे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी स्पष्ट केले.
गुरुवारपासून या खासगी इस्पितळांत लसीकरण
- रेडियन्स हॉस्पिटल, वर्धमाननगर
- न्यू ईरा हॉस्पिटल, वर्धमाननगर
- सीम्स हॉस्पिटल, कामठी रोड
- अर्नेजा हॉस्पिटल, रामदासपेठ,
- बारस्कर हॉस्पिटल, रामदासपेठ
- सुश्रूत हॉस्पिटल, रामदासपेठ
- सेंटर पॉइंट हॉस्पिटल, मेडिकल चौक
- क्युअरईट हॉस्पिटल, दिघोरी चौक
- होप हॉस्पिटल, मानेवाडा
- केशव हॉस्पिटल ,मानेवाडा
- मेडिकेअर हॉस्पिटल, मानकापूर चौक
- कुणाल हॉस्पिटल, छिंदवाडा रोड
- आयकॉन हॉस्पिटल, अमरावती रोड
खासगीमधील आकडेवारी
रुग्णालय- ज्येष्ठ - गंभीर आजारी
कॅन्सर रुग्णालय - ७९ - ४
मोगरे रुग्णालय - १७७ - १३
लता मंगेशकर रुग्णालय (बर्डी) - ५८ - ५५
सेनगुप्ता रुग्णालय - १५१ - १३
मेडिकेअर रुग्णालय - ६६ - ११