लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी डॉक्टरांनी लिहून दिल्यावर संशयित रुग्ण खासगी लॅबमधून नमुना देऊन घरी निघून जातात. पॉझिटिव्ह आल्यावरच मेयो, मेडिकल किंवा एम्समध्ये दाखल होतात. या उलट, महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जाणाऱ्यांना नमुना दिल्यावर व पहिला नमुना निगेटिव्ह आल्यावरही त्यांना १४ दिवसांसाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन राहावे लागते. परिणामी, खासगीमधून चाचणी करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. अशा रुग्णांकडून संसर्ग वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. चाचणीसाठी शासकीय यंत्रणेत मेयो, मेडिकल व एम्ससह माफसु, नीरीमध्ये नमुने तपासले जात आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रयोगशाळांची चाचणीची क्षमताही वाढली आहे. एकट्या मेडिकलच्या प्रयोगशाळेत रोज ७००वर चाचणी होणे शक्य आहे. परंतु मोठ्या संख्येत नमुने गोळा होत नसल्याने पाचही प्रयोगशाळांमध्ये रोज ४०० ते ५००च्या दरम्यान तपासणी होत आहे. यात खासगी प्रयोगशाळांची भर पडली आहे. यातील तीन प्रयोगशाळांना नागपुरातच तपासणी करण्याची परवानगी आहे. पूर्वी चाचणीसाठी ५५०० रुपये आकारले जायचे. परंतु शासनाने थेट प्रयोगशाळेत तपासणीसाठी २५०० तर रुग्णालयातून २८०० रुपये शुल्क आकारण्याचे निर्देश दिले आहेत. शुल्क कमी झाल्यानेही खासगीमध्ये चाचणीचा वेग वाढला आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत खासगीमध्ये साधारण ४५०वर चाचण्या करण्या आल्या आहेत. यातील दीडशेवर चाचण्या महिनाभरातील आहेत. खासगीमध्ये नमुना दिल्यावर क्वारंटाईन व्हावे लागत नाही. यामुळे संशयितांचा कल खासगीकडे वाढत चालला आहे. हा प्रकार कोरोनाचा प्रसार होण्यासाठी हातभार लावणारा ठरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.खासगी प्रयोगशाळेतून पॉझिटिव्हचे प्रमाण वाढत आहेखासगी प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्या वाढली तसेच पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या तीन दिवसांत या प्रयोगशाळेतून २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय, चाचणी करता येत नाही. संशयिताला लक्षणे असल्यावरच डॉक्टर लिहून देत असल्याने असे रुग्ण नमुना देऊन घरी जात असल्याने ते धोकादायक ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे. शिवाय, नमुना दिल्यावर होम आयसोलेशन राहण्यास खासगी लॅबमधून सांगण्यात येत असले तरी तसा स्टॅम्प किंवा आरोग्य विभाग पाठपुरावा करीत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी प्रयोग शाळेत नमूला दिलेल्या व्यक्तीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने सक्तीचे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
खासगी प्रयोगशाळा स्वॅब घेऊन पाठवितात घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 7:51 PM