खासगी प्रवासी वाहनांचे पार्किंग नागपूर शहराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:04 AM2018-07-26T01:04:48+5:302018-07-26T01:05:51+5:30
अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्तांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, फेरीवाले यासह विविध समस्यांवर उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. न्यायालयाने या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये सर्वच संबंधित विभागाचे उच्चाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या समितीने स्थानिकस्तरावर आवश्यक निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. उपसमितीच्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अमरावती व वर्धा रोडवरील खासगी प्रवासी वाहनांच्या पार्किंगसाठी शहराबाहेर स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.
सात हजारांवर पालकांनी दिले प्रतिज्ञापत्र
अल्पवयीन मुलामुलींना ५० सीसीवरील दुचाक्या चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाक्या चालवित आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी न्यायालयाने अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून त्यांची अपत्ये शक्तिशाली दुचाक्या चालविणार नाहीत व चालविल्यास कोणत्याही दुर्घटनेस पालक जबाबदार राहतील असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सात हजारावर पालकांकडून असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
शहरात ५६९ अवैध गोठे
दुग्ध विकास विभागाचे अधिकाºयांनी सर्वेक्षण केले असता शहरामध्ये ५६९ अवैध गोठे आढळून आलेत. त्यापैकी २०० गोठ्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित गोठ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध गोठ्यांमुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दूध काढणे झाल्यानंतर जनावरांना मोकाट सोडले जाते. त्यामुळे जनावरे रोडवर जाऊन बसतात. त्यातून वाहतूक कोंडी होते. अपघात घडतात. समस्या मुळासकट संपविण्याकरिता अवैध गोठे शोधून काढण्यासाठी नगरसेवकांची मदत घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.