नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील जवळपास ६५ टक्के डॉक्टर ‘नॉन प्रॅक्टिस अलॉन्स’ (एनपीए) न घेता धडाक्यात खासगी प्रॅक्टिस करतात. यातील बहुसंख्य डॉक्टर बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागाच्या वेळा पाळत नाहीत. त्यांचे खासगीकडेच लक्ष राहत असल्याने ‘अग्निकांड’सारखे प्रकार घडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
सरकारी रुग्णालयांत चांगली सेवा द्यावी म्हणून शासनाने सार्वजनिक आरोग्य सेवेतील डॉक्टरांच्या ‘एनपीए’मध्ये २५ टक्क्यांवरून ३५ टक्के वाढ केली. व्यवसायरोध भत्ता बंधनकारक करून खासगी प्रॅक्टिसवर बंदी आणली. मात्र, काही डॉक्टर भत्ता घेऊन लपून-छपून खासगी प्रॅक्टिस करतात, तर काही ‘एनपीए’ न घेता सर्रास प्रॅक्टिस करतात. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नागपूर जिल्ह्यासह आजुबाजूच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशचे रुग्ण येतात. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अपघातांचेही रुग्ण याच रुग्णालयात येतात. यामुळे डॉक्टरांची जबाबदारी मोठी असली तरी, त्याबाबत गंभीरतेने घेत नसल्याचे जानेवारीच्या घटनेवरून दिसून येते.
- ४१ मधून १४ डॉक्टर घेतात ‘एनपीए’
उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील वर्ग ‘अ’ गटात ८, तर वर्ग ‘ब’ गटात ३३ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील १४ डॉक्टर ‘एनपीए’ घेतात, तर २७ डॉक्टर ‘एनपीए’ घेत नाहीत. यातील बहुसंख्य डॉक्टरांची स्वत:ची मोठमोठी रुग्णालये आहेत. विशेष म्हणजे, शासनाने हा भत्ता घेणे बंधनकारक केले आहे. परंतु या निर्णयाच्या विरोधात काही डॉक्टर्सनी न्यायालयात जाऊन ‘स्टे’ मिळविला. हा ‘स्टे’ काही वैयक्तिक प्रकरणातच आहे. परंतु याचा फायदा इतरही डॉक्टर घेत असल्याचे दिसून येत आहे.
- बंद ‘बायोमॅट्रिक’चा घेतला जात आहे फायदा
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८.३० ते १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजताची आहे. डॉक्टर वेळेत पोहोचावेत म्हणून ‘बायोमेट्रिक’ प्रणालीचा वापर सुरू होता. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे आजही ही प्रणाली बंदच आहे. त्याजागी ‘मस्टर’वर स्वाक्षरी करून हजेरी लावली जात आहे. त्यावर वरिष्ठांचा वचक नाही. यामुळे १० वाजले तरी अनेक डॉक्टर्स खासगी रुग्णालयांमध्येच राहत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे आरोप आहेत.