गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा बंदोबस्त दिसत असला तरी दुसरीकडे अनेक आस्थापनांमध्ये तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये खासगी सुरक्षा रक्षकांचाही खडा पहारा सुरू आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कारखान्यांचे आणि सुखवस्तु कॉलनीतील बंगल्यांसह फ्लॅटचे रक्षण करण्यासाठी हा घटक १२ तासांची सेवा देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे.पोलिसांची गस्तीवरील वाहने, चौकातील बंदोबस्त सर्वांच्या नजरेस पडताना खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा काहिशी दुर्लक्षित ठरत आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार करता सुमारे १३ हजारांवर सुरक्षा रक्षक आज दिवसरात्र सेवा बजावत आहेत. शासनाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळांतर्गत ३ हजार ८०० सुरक्षा रक्षकांची नोंदणी असून प्रत्यक्ष ३ हजार १०० रक्षक कार्यरत आहेत. या सोबतच खासगी सुरक्षा सेवा पुरविणाऱ्या नागपुरात १०० च्या वर कंपन्या (सिक्युरिटी एजन्सी) असून त्यांच्या अंतर्गत १० हजारांवर खासगी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत असलेले जवळपास ९९ टक्के रक्षक शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. शासकीय आणि निमशसकीय महामंडळांमध्ये ते सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या दिवसांमध्ये बोर्डाच्यावतीने या सर्वांना मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात आले आहेत.खासगी सेवा देणाºया कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले १० हजार रक्षक सेवा देत आहेत. कारखाने, एमआयडीसीमधील उद्योग समूह, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, बंगले, कॉलनींमधील सदनिका आदी ठिकाणी त्यांची लॉकडाऊनच्या काळातही प्रामाणिक सेवा सुरू आहे. बहुतेक कंपन्यांनी सध्या त्याच्या अंतर्गत काम करणाºया रक्षकांना मास्क, हँड सॅनिटायझर पुरविले आहे. सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत कार्यरत असणाऱ्यांना गार्ड बोर्ड कायदा लागू असला तरी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्यांना मात्र तो लागू नाही, हे विशेष !विनातक्रार करतात सेवा१२ तासांची रोज ड्युटी करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांच्या समस्याही अधिक आहे. मिळणारा पगार तुटपुंजा आहे. अनेकांकडे स्वत:चे घर नाही. ड्युटीच्या ठिकाणापासून कामाचे ठिकाण बरेच लांब आहे. अनेकांकडे चांगल्या दुचाक्याही नाही. गणवेश, ओळखपत्र आणि दंडुका याशिवाय रक्षणासाठी दुसरे शस्त्र नाही. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तरीही कुरकूर न करता त्यांचे सेवाकार्य सुरू आहे.
खासगी सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 10:25 AM