नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
By नरेश डोंगरे | Published: November 17, 2024 06:29 PM2024-11-17T18:29:45+5:302024-11-17T18:32:31+5:30
भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे बडकस चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला.
नरेश डोंगरे / नागपूर : संघ मुख्यालय जवळच्या चौकात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना भाजपा कार्यकर्त्यांनी कमळ दाखवले. प्रत्युत्तरात प्रियंका गांधी यांनी झेंडे दाखवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन, काही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असल्याची घोषणा केली. या घडामोडीमुळे बडकस चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला.
नागपूरच्या बडकस चौकात काँग्रेस-भाजपची रॅली समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण... pic.twitter.com/3mHsBpZwHy
— Lokmat (@lokmat) November 17, 2024
आज संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. महालमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रियंका गांधी यांनी अभिवादन केले. त्यानंतर रोड शोला सुरुवात झाली. कोतवाली चौक, केळीबाग रोड मार्गे प्रचंड गर्दीचे अभिवादन स्वीकारत प्रियंका गांधी पुढे जात होत्या.
सायंकाळी ५.४० च्या सुमारास रॅली चौकात आली असता न्यू आदर्श मिष्ठान्न भंडार असलेल्या इमारतीच्या स्लॅबवर भाजपचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी प्रियंका यांना भाजपाचे झेंडे दाखविले. ते पाहून प्रियंका यांनी त्यांना नमस्कार केला. तसेच माईक हातात घेऊन झेंडे दाखवणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, मात्र काही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार, असे त्यांनी वक्तव्य केले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
दुसरीकडे उजव्या बाजूला भाजपाचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन पुढे जात होते. त्यांनी तिथेच थांबून प्रियंका गांधी यांच्या रोड शोला विरोध करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्तेही त्यांच्यासमोर गेले. त्यानंतर येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच प्रचंड संख्येत असलेल्या पोलिसांनी मोर्चा सांभाळून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना वेगळे करून घोषणाबाजी बंद करण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्ते मात्र जुमानात नसल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटण्यास सुरुवात केली. यामुळे सुमारे पंधरा मिनिटे येथे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर मोठ्या संख्येतील पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना कसेबसे आवरले आणि दोन्ही रॅली आपापल्या मार्गाने पुढे निघून गेल्या. प्रचंड स्फोटक स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच प्रियंका यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी बडकस चौकातून त्यांना त्यांच्या विशेष वाहनात बसविले आणि तेथून प्रियंका पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. तिकडे मात्र चौकात अर्धा तास पर्यंत तणावाचेच वातावरण होते.