कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे. अगोदरपासूनच पाणीकपातीचा सामना करीत असलेल्या कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांचे वीज उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्यावर सद्यस्थितीत मौन साधले आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. जर पाण्याचा पुरवठा कमी झाला तर स्वाभाविकपणे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.‘महाजेनको’ने या केंद्रांसाठी मे महिन्यातच पेंच व तोतलाडोह येथील ‘डेड स्टॉक’मधून पाण्याची मागणी केली होती. १५ जुलैपर्यंतच वीज उत्पादन शक्य होईल, असे दोन्ही केंद्रांनी स्पष्ट केले होते. आता नागपुरात पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर महाजेनकोच्या दोन्ही केंद्रांवर तणाव वाढला आहे. दोन्ही वीज केंद्रांना पेंच व तोतलाडोह येथून पाणी मिळते. मात्र या दोन्ही जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज उत्पादन घटले तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होईल. परंतु राज्यातील इतर भागांमध्ये होत असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.कोराडी व खापरखेडा वीज केंद्रांसाठी प्रशासनाने एकूण ६८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणीसंकटामुळे याला कमी करून ४८ एमएम क्युब करण्यात आले आहे. प्रशासनाने कोराडी औष्णिक वीज केंद्रासाठी ३० तर खापरखेडा वीज केंद्रासाठी ३८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र सद्यस्थितीत पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, कोराडीला २० आणि खापरखेड्याला २८ एमएम क्युब पाणी दिले जात आहे.
आरक्षणाहून कमी पाण्याच्या उपयोगाचा दावादिलेल्या आरक्षणाहून कमी पाण्याचा उपयोग करण्यात येत असल्याचा दावा दोन्ही वीज केंद्रांनी केला आहे. सोबतच खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात दररोज १ लाख २० हजार एम क्युब पाणी रोज साठवले जात आहे. एक लाख एम क्युब पाण्याची मागणी असताना खापरखेड्यात जास्तीत जास्त ७५ हजार एम क्युब पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम क्युब पाण्याची आवश्यकता पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. कॉलनी तसेच प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा राख व्यवस्थापनात परत उपयोग करण्यात येत आहे. यासोबतच कॉलनीमध्ये पाण्याच्या बचतीसाठी सर्व उपाय करण्यात येत आहेत व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात आला आहे.