आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ डिसेंबरमध्ये येणार होता. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड लोकांच्या हाती येतील, असा विश्वास प्रकाशन समितीने व्यक्त केला होता. हे खंड तयारही आहेत. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे गेल्या ३० मार्च रोजी पुनर्गठन झाले. तेव्हापासून नवीन खंड प्रकाशनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत: ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते. परंतु ते शक्य होऊ शकले नाही. बाबासाहेबांचे नवीन खंड प्रकाशित व्हावे, यासाठी लोकांचा रेटा वाढत चालला आहे. प्रकाशन समितीकडे यासंदर्भात अनेक निवेदने रोज पाठवली जात आहेत.
विजयादशमीच्या दिवशी एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, अशी लोकांची इच्छा होती; परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर डिसेंबरपर्यंत किमान चार नवीन खंड प्रकाशित होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी स्पष्ट केले होते. या चार खंडांत ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश आहे. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे. हा खंडदेखील लवकरच प्रकशित होईल.
इंग्रजी खंड-१३ च्या मराठी अनुवादित ग्रंथाचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. हा मराठी ग्रंथ १२०० पृष्ठांचा आहे. या ग्रंथाशिवाय सोर्स मटेरिअलचा खंड १ -‘डॉ. आंबेडकर ॲण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड ६, खंड ८, खंड १० या ग्रंथाचे पुनर्मुद्रणाचे कामदेखील अंतिम टप्प्यावर असून, येत्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत चार-पाच खंड विक्रीकरिता उपलब्ध होतील, या दृष्टीने समिती कार्य करीत असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु तेही शक्य होऊ शकलेले नाही.
सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड शासन प्रकाशित करू शकले नाही. तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यासही शासन अपयशी ठरले. दरम्यान, उच्च न्यायालयानेसुद्धा याची गंभीर दखल घेत शासनाला जाब विचारला आहे, असे असतानाही जे खंड तयार आहेत. त्याचे साधे प्रकाशन करण्यासाठीसुद्धा शासनाकडे वेळ नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाची ही कृती जाणीवपूर्वक तर नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
बाबासाहेबांचा ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार झाला आहे. तो महापरिनिर्वाणदिनी प्रकाशित व्हावा, यासाठी समितीने प्रयत्न केले. परंतु ते शक्य होऊ शकले नाही.
- डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
- ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ अगोदर तयार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी प्रकाशित करण्याची मागणी केली. ती पूर्ण झालेली नाही. किमान महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरी तो प्रकाशित व्हायला हवा होता. प्रकाशनासाठी मुख्यमंत्री, मंत्र्यांची तारीख घेणे, त्यांना दिवसाचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी ही समितीची आहे. त्यामुळे हे अपयश पूर्णपणे समितीचे आहे. केवळ हाच ग्रंथ नव्हे तर अनेक ग्रंथ तयार आहेत. परंतु ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही तर त्याचा फायदा काय?
- प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर