नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी गंभीरतेने निरीक्षण करीत नसल्यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस मध्य नागपूरचे अध्यक्ष रिजवान अन्सारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिले.
कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून औषध दुकानांचे निरीक्षण बंद आहे. त्यामुळे औषध विक्रेता आणि डॉक्टर्स मनमानी करीत आहेत. डॉक्टरांनी लिहिलेली औषधी ठरावीक फार्मसीतच मिळते. त्यामुळे ग्राहकांची लूट होते. ग्राहकांना सवलत मिळावी आणि विक्रेत्यांची मनमानी बंद व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.
डॉक्टर रुग्णाला चार गोळ्यांचा डोस देत असेल तर विक्रेते दहा गोळ्या विकत घेण्यास सांगतात. याद्वारे ग्राहकांची लूट होत आहे. अनेक विक्रेते औषधांचे बिल देत नाहीत. जर औषधांचे दुष्परिणाम झाल्यास मेडिकल क्लेम आणि तक्रार कशी करणार, हा प्रश्न आहे. कन्झ्युमर फोरममध्ये ग्राहकांच्या तक्रारीवर कारवाई होत नाही, अशा समस्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
शिष्टमंडळात प्रशांत पवार, जावेद हबीब, महादेव फुके, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, मुन्ना तिवारी, संतोष सिंह, वसीम शेख लाल, इसराईल अन्सारी, राकेश बोरीकर, भय्यालाल ठाकूर, जावेद खान यांचा समावेश होता.