देवेंद्र फडणवीस : विद्यापीठात सुशासन दिन नागपूर : राज्यासमोर आजच्या घडीला निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुशासनाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दीक्षांत सभागृहात सुशासनविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.कार्यशाळेच्या या उद्घाटनप्रसंगी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी सदानंद भावे, विभागीय आयुक्त अनुपकुमार , जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्यावेळेला प्रस्थापित व्यवस्था सुशासन देऊ शकत नाहीत, तेव्हा जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. एखाद्या व्यक्तिविशिष्टापेक्षा व्यवस्थेला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनासमोर पारदर्शक प्रशासन चालविण्याचे आव्हान आहे. हीच पारदर्शकता हा सुशासनाचा मूळ गाभा आहे. याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करता येऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. पुढील अधिवेशनात सेवा हमी विधेयक आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकौशल्याचे वैशिष्ट्य विषद केले.अनुपकुमार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडली तर डॉ. देशपांडे यांनी आभार मानले. नागपूर विद्यापीठ कर्मचारी कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘प्रोजेक्टर’च्या माध्यमातून सुशासनावर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
सुशासनाद्वारे सुटतील समस्या
By admin | Published: December 26, 2014 12:55 AM