रामटेक येथे आयोजन : घरकुलासंबंधी तक्रारी अधिकरामटेक : स्थानिक नगर परिषदेच्या आवारात आ. डी. एम. रेडी यांच्यावतीने जनता दरबाराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक नागरिकांनी विविध मूलभूत समस्या मांडल्या. त्यातही शहरात बांधण्यात आलेल्या घरकुलांसंबधीच्या तक्रारी अधिक असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या प्रसंगी आ. रेड्डी, नगराध्यक्ष नलिनी चौधरी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष रमेश कारामोरे, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार प्रसाद मते, मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्यासह सर्व नगरसेवक, पालिकेचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.शनिवारी दुपारी १२.३० वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी स्थानिक नागरिकांनी शहरातील खड्डेमय झालेले विविध रस्ते, काही भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या, पालिकेद्वारे बांधण्यात आलेले घरकुल, परत पाठविण्यात आलेला घरकुलाचा निधी, वनविभाग, नझूल, नगर पालिकेच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण, अतिक्रमित जागेवर वास्तव्याला असलेल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करणे यासह अन्य समस्या मांडण्यात आल्या. शहरातील पाणी समस्या येत्या तीन महिन्यात पूर्णपणे सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष चौधरी यांनी दिली. महात्मा गांधी चौक ते डॉ. कुरेशी हॉस्पिटल दरम्यानच्या मार्गाचे सिमेंटीकरण करण्याची सूचना रेड्डी यांनी केली. घरकुलासंबंधीच्या तक्रारींची दखल घेत रेड्डी यांनी पालिका कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. लाभार्थ्यांना घरकुल मिळणार नसेल तर त्यांना त्यांनी भरलेली रक्कम परत करण्याची सूचनाही त्यांनी केली. आगामी दिवसांत महसूल, नगर पालिका, वनविभाग व भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून मालकी हक्काचे पट्टे ही समस्या निकाली काढणार असल्याचे आश्वासन रेड्डी यांनी यावेळी दिले. (तालुका प्रतिनिधी)
जनता दरबारात पडला समस्यांचा पाऊस
By admin | Published: October 03, 2015 3:28 AM