लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेले रामटेक बसस्थानक सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा नियमित सामना करावा लागत आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे प्रवाशांना बसायला जागा अपुरी पडत आहे. त्यातही रामटेकवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना अनेक हाल सोसावे लागतात, शिवाय अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतु या गंभीर प्रकाराकडे आगार प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.येथील बसस्थानकावर भरउन्हात प्रवासी उभे राहतात. पावसाळा व उन्हाळ्यात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. अनेकदा प्रवासी जाळीजवळच्या पारीवर बसतात. बाजूलाच सुलभ शौचालयाचे गडर चेंबर आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना नाकावर रूमाल ठेवूनच बसावे लागत आहे. बसस्थानकावरील घाण व दुर्गंधीमुळे शेकडो प्रवासी बसस्थानकाबाहेर फिरताना आढळतात. वेळप्रसंगी धावतपळत प्रवाशांना एसटी पकडावी लागते. बसस्थानकाची अशी गंभीर अवस्था असताना आगार प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे याबाबत विद्यार्थी, महिला, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, वयोवृद्ध तसेच इतर प्रवासी बसस्थानकावरील समस्या व होणारी गैरसोय याबाबत आगार प्रशासनाच्या लक्षात आणून देत तक्रारीही करतात. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.नागपूरला जाणाऱ्या बसेस ज्या फलाटावर थांबतात, त्या बाजूला प्रवासी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना भरउन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात ही बाब एखाद्या प्रवाशाच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे रामटेकवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन प्रवासी निवारा तात्काळ निर्माण करणे गरजेचे आहे.
प्रवाशाच्या तक्रारीला केराची टोपलीबसस्थानकावरील विविध समस्यांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बसण्यासाठी प्रवाशांना जागा शोधावी लागते. या बसस्थानकामध्ये काही तास असे असतात की, प्रवाशांना बसायला जागा न मिळाल्याने तासन्तास उभे राहावे लागते. अपुऱ्या बसफेऱ्या व विविध समस्यांमुळे अनेकदा प्रवासी आगार प्रशासनाकडे तक्रारी करतात. परंतु प्रवाशांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार आगार प्रशासनाकडून होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.