नागपूर : विदर्भातील व्यापाऱ्यांच्या समस्या नागपुरात सोडविण्यासाठी राज्य शासनाने यंदाही हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे, अशी मागणी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केली आहे.
मेहाडिया म्हणाले, नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असून विदर्भाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हिवाळी अधिवेशनात विदर्भातील व्यापारी आणि जनता आपल्या समस्या शासनासमोर मांडतात. सध्या कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन कारणाने विदर्भातील व्यापारी आणि जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्या समस्या शासनासमोर ठेवून त्याचे निवारण करणे आवश्यक आहे.
चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, यावर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होत नसल्याने विदर्भातील व्यापारी, उद्योजक आणि जनतेच्या समस्या शासनाकडे मांडता येणार नाहीत. कोरोना महामारी आणि कठोर नियमांमुळे विदर्भातील प्रतिनिधींना आपल्या समस्या मुंबईतील अधिवेशनात मांडता येणार नाहीत. कोरोना महामारीची स्थिती पाहता महाराष्ट्राच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करावे, असे अश्विन मेहाडिया आणि रामअवतार तोतला यांनी म्हटले आहे.