लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोपामुळे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक सोहळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. रामनवमीला निघणारी पश्चिम नागपूर रामजन्मोत्सव शोभायात्रा याच कारणामुळे रद्द करण्याचा निर्णय याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतला गेला होता. आता त्या पाठोपाठ पोद्दारेश्वर राम मंदिर जन्मोत्सव शोभायात्रा समितीने आपली शोभायात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मंदिराचे विश्वस्त व्यवस्थापक रामकृष्ण पोद्दार यांनी दिली आहे.देशातील सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून लोकप्रिय असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिर जन्मोत्सव शोभायात्रेचे हे ५४वे वर्ष असून, देशावर अचानक उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे ही शोभायात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे शोभायात्रेची संपूर्ण तयारी झाली होती आणि पोलीसही व्यवस्थेत सज्ज होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे. त्याअनुषंगाने अनुकूल परिस्थितीचा आढावा घेऊन मे महिन्यात येणाऱ्या जानकी नवमीला अर्थात २ मे रोजी ही शोभायात्रा काढण्यावर सध्या आयोजक विचार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:59 AM
पोद्दारेश्वर राम मंदिर जन्मोत्सव शोभायात्रा समितीने आपली शोभायात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देजानकी नवमीला १ मे रोजी होण्याची शक्यता