नागपूर : बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या अपिल शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या. सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आली नाही, या तांत्रिक कारणामुळे उच्च न्यायालयाने सर्वांना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय रोहीत देव व अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला.
७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. इतर आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर व विजय नान तिरकी यांच्यासह पांडू पोरा नरोटे याचा समावेश होता. नारोटेचे आजारपणामुळे नुकतेच निधन झाले. परिणामी केवळ उर्वरित आरोपींच्या बाबतीत हा निर्णय देण्यात आला आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता.