भाजप पदाधिकारी सुमित ठाकूरची गुंडगिरी : नेते आणि बिल्डरांचे पाठबळ नागपूर : कुख्यात गँगस्टर सुमित ठाकूर याची गुंडगिरी सध्या वाढली आहे. नेते आणि बिल्डरांचा आश्रय असल्याने पोलिसांचीही त्याला भीती उरलेली नाही. त्यामुळे वाद मिटल्यानंतरही त्याने शुक्रवारी आपल्या भावाच्या मदतीने एका प्राध्यापकाच्या कारला आग लावली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी सुमित ठाकूर, त्याचा भाऊ अमित ठाकूर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडित प्राध्यापकांच्या कुटुंबियांसह परिसरात दहशत पसरली आहे. मल्हार मस्के असे पीडित प्राध्यापकांचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सुमित फ्रेण्ड्स कॉलनीत राहतो. त्याच्या विरुद्ध खून, अपहरण, खंडणी वसुली सारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध मकोकाची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. सुमितला आठ महिन्यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमित आपल्या कारने घरून निघाला. पीडित प्राध्यापकांची कार त्यांच्या घरासमोरच उभी होती. सुमितची कार प्राध्यापकाच्या कारवर धडकली. यात सुमितच्या कारला खरचटले. त्यामुळे सुमित प्राध्यापकाला नुकसान भरपाई मागू लागला. प्राध्यापकाने सुमितला त्याचीच चुकी असल्याचे सांगून नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे सुमित संतापला. तो प्राध्यापकाला मारहाण करू लागला. प्राध्यापकाचे कुटुंबीय भांडण सोडवायला आले. परंतु तो त्यांच्याशीही वाद घालू लागला. दरम्यान त्याने आपल्या कारमधून रॉड काढले आणि प्राध्यापकाच्या कारची तोडफोड केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली. अनुचित घटना होण्याची शक्यता लक्षात घेता प्राध्यापकाने पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली. सुमितचे नाव येताच गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेतील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सुमितला पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करताच गिट्टीखदान येथील भाजपचा एक बिल्डर पदाधिकारी ठाण्यात पोहोचला. त्याने प्राध्यापक व त्यांच्या कुटुंबीयांवर ठाण्यात तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता.
प्राध्यापकाची कार पेटवली
By admin | Published: September 26, 2015 2:51 AM