फळ पीक विमा योजना : शेतकऱ्यांनी फिरविली पाठजीवन रामावत नागपूरराज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना वादळ, वारा, पाऊस व गारपिट यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा कवच मिळावे, या हेतूने राज्यभरात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविली जात आहे. मात्र मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहता या योजनेचा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांनाच अधिक फायदा झाल्याचे दिसून येत आहे. यातून या कंपन्यांची नफाखोरी जगजाहीर झाली असून, त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की, विमा कंपन्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०११-१२ या वर्षात आंबिया बहाराच्या संत्रा पिकासाठी नागपूर जिल्ह्यातील एकूण १० हजार २६९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यासाठी संबंधित विमा कंपन्यांकडे ६ कोटी ८१ लाख रुपयांचा विमा हप्ता जमा केला होता. शेतकरी विमा लाभाच्या प्रतीक्षेत माहिती सूत्रानुसार २०१५-१६ मध्ये नागपूर जिल्ह्यातील ३,३४७ शेतकऱ्यांनी मृग बहार संत्रा व मोसंबी पिकाचा विमा काढला होता. यासाठी विमा कंपनीकडे एकूण २ कोटी १० लाख रुपयांचा विमा हप्ता जमा केला आहे. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. शिवाय त्याचवेळी कृषी विभागसुद्धा हातावर हात धरून बसलेला दिसून येत आहे. पुढील महिनाभरात खरीप हंगाम सुरू होत असून, कृषी विभागाने २०१६-१७ साठी पुन्हा ही योजना राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र त्याचवेळी कृषी विभागाला मागील वर्षातील विमा लाभ अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा विसर पडलेला दिसून येत आहे.
विमा कंपन्यांची नफाखोरी
By admin | Published: May 09, 2016 3:03 AM